९९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात प्रा. मधुकर जाधव यांच्या थँक्स तुकोबा कवितेने समाजातील कुप्रवृत्तीला दाखवला आरसा
सिंदखेडराजा (अनिल दराडे) अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित स्वराज्याच्या राजधानींपैकी एक असलेल्या सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कवी संमेलनामध्ये सहभागी श्री व्यंकटेश महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांच्या थँक्स तुकोबा या कवितेने समाजातील संकुचित व बेगडी प्रवृत्तीला आरसा दाखवला. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य मंडपात निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न झाले.
महाराष्ट्र व इतर राज्यातून अनेक नामवंत कवी या संमेलनात सहभागी झाले होते. प्रा. मधुकर जाधव यांनी
तुकोब…
तुम्ही घेतल्या हाती चिपळ्या
अन् केला सत्याचा गजर
सत्य असत्याशी मन ग्वाही करून
असत्याने घेतली आता सत्याची जागा
चिपळ्यांच्या ऐवजी वाजताहेत चहूकडे
दांभिकतेचा डंका आणि बेइमानीचे चौघडे…
या ओळींच्या माध्यमातून समाज प्रवृत्तीवर परखड भाष्य केले. तसेच
असाध्य ते साध्य करण्या
अभ्यास करा तुका म्हणे
असे म्हणायचीही सोय राहिली नाही, कारण
ऐकणारा सहज परतवतो सल्ला
गांभीर्य लक्षात न घेता
तुका म्हणे तर म्हणू दे
तू का म्हणे ?
अशी हेटाळणी करून…
या ओळींच्या माध्यमातून कवी मधुकर जाधव यांनी खंत व्यक्त केली.
श्रीकांत देशमुख आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिता राजेपवार यांनी प्रा. मधुकर जाधव यांचा सत्कार करून सन्मानित केले.
प्रा. मधुकर जाधव यांच्या गौरवाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
