तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Screenshot_2026-01-07-08-45-29-44_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

महिलांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी संघटित होण्याचे मान्यवरांचे आवाहन; ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’चा जागर

सिंदखेडराजा (अनिल दराडे) स्त्री शिक्षणाच्या आद्य जननी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती तांदुळवाडी येथील अंगणवाडी केंद्रात ३ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने केवळ अभिवादनच नव्हे, तर महिला सक्षमीकरण आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या विषयावर विचारांचा जागर करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवखेड येथील प्रसिद्ध समाजसेविका, उमेद अंतर्गत आय.सी.आर.पी. (ICRP), सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तथा ‘राज्यस्तरीय राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती सन्मान’ पुरस्कार विजेत्या सौ. रेवती सुंदरराव आढाव होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच (रूम्हणा) तथा प्राध्यापिका सौ. धनश्री शिवराज कायंदे, भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य श्री. शिवराज तोताराम कायंदे, चांगेफळ येथील सौ. संघमित्रा समाधान तायडे आणि श्रीमती साधनाताई घनश्याम मोगल यांची विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थिनींनी मांडले परखड विचार
कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनी आराध्या घनश्याम मोगल हिने सावित्रीबाई फुले यांच्या खडतर आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. आजच्या आधुनिक काळातही स्त्रियांवर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी तिने शासकीय मदत क्रमांक, पोलीस हेल्पलाईन आणि आपत्कालीन सेवांची तांत्रिक माहिती देऊन महिला सक्षमीकरणावर आपले प्रखर विचार मांडले. तिच्या या अभ्यासपूर्ण भाषणामुळे उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.याप्रसंगी श्रीमती साधना मोगल यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचा पदर उलगडला. पतीच्या निधनानंतर दोन मुलांचा सांभाळ करताना सोसलेल्या हालअपेष्टा आणि सामाजिक आव्हानांचा त्यांनी अनुभव कथन केला. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची कास धरून आपल्या मुलांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी त्या करत असलेल्या जिद्दीचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.
तसेच, सौ. संघमित्रा तायडे यांनी आपल्या मार्गदर्शनात जुन्या काळातील स्त्रियांच्या शिक्षणातील अडथळे आणि आजची नोकरी करणारी स्त्री, तिचे कायदेशीर अधिकार व कर्तव्ये या विषयावर सविस्तर विवेचन केले.”अजूनही महिलांना परवानगी घ्यावी लागते ही शोकांतिका” – सौ. रेवती आढाव
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. रेवती आढाव यांनी सावित्रीबाईंच्या कार्यामुळे महिलांची जी शैक्षणिक आणि कौटुंबिक प्रगती झाली, त्याचा सविस्तर आढावा घेतला. मात्र, आजही महिला पूर्णपणे मानसिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की,”ज्या सावित्रीमाईंनी शेण-गोटे सोसून स्त्रियांना अधिकार मिळवून दिले, त्यांच्याच जयंती कार्यक्रमाला जाण्यासाठी आजही अनेक महिलांना घरातील पुरुषांची किंवा सदस्यांची परवानगी घ्यावी लागते, ही आजच्या काळातील मोठी शोकांतिका आहे.”
जनजागृती रॅलीने परिसर दुमदुमला
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी तांदुळवाडी गावातून ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या शासकीय अभियानांतर्गत भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” अशा घोषणांनी गावचा परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीत मान्यवर, अंगणवाडी कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

You may have missed

error: Content is protected !!