सावित्रीबाई फुलेंनी सुरु केलेली स्त्री गौरवाची परंपरा अविरत सुरु रहावी – प्राचार्य डॉ. निलेश गावंडे राजमाता जिजाई महिला अर्बन कडून ‘सावित्रीच्या लेकींचा सन्मान’….
निलेश कोल्हे
चिखली:- राजमाता जिजाई महिला अर्बन को. ऑप. सो. मर्या. चिखलीच्या संचालक मंडळाकडून सावित्रीबाई फुले जयंती व प्रा. डॉ. सौ. मिनलताई गावंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘सन्मान सोहळा सावित्रीच्या लेकींचा’ या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल स्वरांजली येथे करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचा समर्थ वारसा पुढे नेणाऱ्या प्रा. डॉ. सौ. मिनलताई निलेश गावंडे व चिखली शहरातील शिक्षण, कला, अध्यात्म, संस्कृती, व्यवसाय, व्यवस्थापन, क्रीडा, वाणिज्य व सहकार क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या दहा स्त्रियांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला. याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, प्रा. डॉ. सौ. मिनलताई निलेश गावंडे व प्रा. नारायणराव गावंडे, सौ आशालता गावंडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली स्त्री गौरवाची परंपरा अविरत सुरु रहावी यासाठी समाजातील स्त्रियांनी पुढे येवून आपापल्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करणे गरजेचे आहे. असे म्हणून अशा सन्मान सोहळ्यामुळे स्त्रियांना कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते असे मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देतांना पतीची खंभीर साथ असल्यामुळे शिक्षण, समाज, राजकारण, सहकार, संस्कृती व अध्यात्म अशा विविध क्षेत्रात मी हे कार्य करू शकले, काळ बदलला असून स्त्रियांच्या पाठीशी पुरुषांनी खंभीरपणे उभे राहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महिला पत्रकार सौ. वैशाली काशीनाथ शेळके व कु. अदिती श्रीकृष्ण ठेंग यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शिक्षण व्यवस्थापन क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या डॉ. पूजा आशुतोष गुप्ता, वित्त व कर क्षेत्रात अतूलनीय कार्य करणाऱ्या चिखली तालुक्यातील प्रथम महिला सि. ए. हा बहुमान पटकावणाऱ्या कु. पायल भगवान नागवाणी, बँकिंग व सहकार क्षेत्रात कार्य करीत असतांना पाच हजार महिलांच्या बचत गटाचे संघटन करणाऱ्या सौ. जयश्री दिपक देशमाने, आरोग्य सेवा करीत असतांना मेळघाटातील कुपोषित मुलांना सेवा देणाऱ्या डॉ. मिना कासारे, शैक्षणिक क्षेत्रातून सौ. वैशाली बावस्कर, पत्रकारितेच्या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या झुंजार दस्तक या सांय. दैनिक वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादिका, डिझायनर व महिला पत्रकार सौ. वैशाली काशीनाथ शेळके, धार्मिक क्षेत्रात अतूलनीय कार्य करणाऱ्या सौ. आशा अशोक इंगळे, कला क्षेत्रात अतूलनीय कार्य करणाऱ्या कु. ज्ञानदा योगेश काळे, व्यवसाय क्षेत्रातून सौ. लक्ष्मीबाई एकनाथ हांडगे, क्रीडा क्षेत्रातून कु. अंकिता वासुदेव सोळंकी यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली बावस्कर यांनी केले तर आभार प्रा. कु. रागिणी तापडिया यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजमाता जिजाई महिला अर्बन को. ऑप. सो. मर्या. चिखलीच्या संचालिका डॉ. स्नेहल परिहार यांनी केले. या कार्यक्रमाला चिखली येथील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
