विवेकानंद जयंती उत्सव आजपासून सुरू:हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमच्यावतीने तयारी पूर्ण
हिवरा आश्रम (बुलढाणा माझा न्युज )हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद आश्रमात तीन दिवसीय ज्ञानयज्ञ उत्सवास सुरुवात झाली असून, शोभायात्रेने या पर्वाचा उद्घोष केला जाणार आहे. या उत्सवात ज्येष्ठ तत्वचिंतक, प्रबोधनकार आणि निरूपणकार समाजजागृतीचे कार्य करतील. स्वामी विवेकानंद व प.पू. शुकदास महाराजांच्या विचारपरंपरेचा वारसा पुढे नेणारा हा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता, ग्रामीण समाजाच्या बौद्धिक जडणघडणीचा केंद्रबिंदू ठरला आहे.

उत्सवाच्या पहिल्याच दिवशी हरिहरतीर्थापासून स्वामी विवेकानंद व प.पू. महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा निघणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात शेकडो दिंड्या सहभागी होऊन ‘विवेकानंद विचारांचा’ जयघोष करतील. तीनही दिवस
नामवंत व्याख्याते, कीर्तनकार आणि प्रवचनकारांचे कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी सुमारे दोन लाख भाविकांच्या महाप्रसादासाठी आवश्यक व्यवस्थांची चाचपणी पूर्ण झाली आहे. महाप्रसादासाठी अडीचशे क्विंटल गहू दळून ठेवण्यात आला असून, किराणा व अन्य साहित्याची जमवाजमव करण्यात आली आहे. विविध समित्यांमार्फत जबाबदाऱ्यांचे स्पष्ट वाटप करण्यात आले असून, कार्यकर्त्यांच्या निवास भोजनाची, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची व सुरक्षेची व्यवस्था उभी करण्यात आली आहे.
जागतिक तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या स्वामी विवेकानंदांचे धर्मविषयक तत्त्वज्ञान आणि सामाजिक सुधारणा विषयक विचार आजच्या पिढीसाठीही तितकेच प्रेरक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या विवेक-आनंदाच्या पर्वात मोठ्या संख्येने युवक व नागरिक सहभागी होत आहेत.
आज सकाळी हरिभक्त परायण गजाननदादा शास्त्री पवार महाराज यांचे व्याख्यान होईल. दुपारी कीर्तन व त्यानंतर शोभायात्रा निघेल.
