श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमदान शिबिराचे उद्घाटन संपन्न
चिखली (एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी ) येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमदान शिबिराचे उद्घाटन दिनांक ७ जानेवारी २०२६, रोजी मुक्काम पोस्ट वळती, तालुका चिखली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. हसदर शिबिर दिनांक ६ जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ होणार आहे.
या विशेष श्रमदान शिबिराच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पडोळे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री मधुकररावजी पाटील, आजीवन सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुनील चिंचोले, वळती ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ. जी. जी. माल्टे, मराठी विभाग प्रमुख, डॉ. एस. आय. जुक्कलकर इंग्लिश विभाग प्रमुख, डॉ. विजयश्री हेमके प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, तसेच प्रा. तृप्ती श्रीरामे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. आर. पडोळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास विद्यार्थ्यांना सविस्तरपणे सांगितला. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी व सेवाभाव रुजविण्यासाठी एनएसएसची स्थापना कशी झाली, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी एनएसएसच्या उपक्रमांमध्ये प्रामाणिकपणे सहभागी होऊन समाजहिताची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटक माननीय श्री मधुकरजी पाटील यांनी श्रमदानासाठी स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. माननीय श्री सुनीलभाऊ चिंचोले, प्रमुख पाहुण्यांनीही श्रमदान, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सामाजिक प्रबोधन या उपक्रमांचे महत्त्व विशद केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निलकुमार काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत शिबिरा मागील उद्दिष्टे व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. मुक्ती जाधव यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन केले.
या विशेष श्रमदान शिबिराच्या माध्यमातून गाव स्वच्छता, वृक्षारोपण, पाणलोट प्रकल्प, आरोग्यविषयक जनजागृती व सामाजिक प्रबोधनाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
