वर्दडी खुर्द येथे नागरे महाविद्यालयाच्या रासेयो निवासी शिबिराचा समारोप उत्साहात

IMG-20260109-WA0007

सिंदखेडराजा( अनिल दराडे) नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबीड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दत्तक ग्राम वर्दडी खुर्द येथे आयोजित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व विकासाभिमुख उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पार पडला.
या समारोपीय कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. हनुमंत भोसले (जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, बुलढाणा), प्राचार्य डॉ. राजेंद्र बोरसे (भगवान बाबा महाविद्यालय, लोणार), शिवराज भाऊ कायंदे (सचिव, भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ), उपप्राचार्य प्रा. पवार तसेच जायभाये महाराज हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय नागरे (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती – अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य) होते.
समारोप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पुढे रासेयो सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. नैना गवारे यांनी शिबिराचा सविस्तर अहवाल व मनोगत सादर केले. त्यांनी शिबिराच्या सात दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सखोल आढावा घेतला.
अहवालात नमूद करण्यात आले की, शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रार्थना व योगासनांनी होत होती. त्यानंतर दत्तक ग्राम वर्दडी खुर्द येथे श्रमदानाच्या माध्यमातून शोषखड्डे व पाझर खड्डे तयार करणे, कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संगोपन, तसेच जल व्यवस्थापनासाठी बंधारा बांधणे असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. जलसंधारणाच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असून त्याचा दीर्घकालीन लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिबिराच्या कालावधीत दुपारच्या सत्रांमध्ये विविध सामाजिक विषयांवर बौद्धिक मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांतून युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच व्यक्तिमत्त्व विकासाबाबत जागृती करण्यात आली. निवासी स्वरूपाच्या या शिबिरामुळे स्वयंसेवक विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाशी जवळून परिचित होण्याची संधी मिळाली.
समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घडविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी दाखविलेला सेवाभाव, शिस्त व संघटनात्मक कौशल्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय नागरे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, ग्रामस्थ व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले. रासेयोच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा महाविद्यालयाचा उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या समारोप कार्यक्रमास महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी तसेच वर्दडी खुर्द गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सात दिवस चाललेल्या या निवासी शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, पर्यावरणीय जाणीव व जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ झाल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!