सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावेजिजाऊ भक्तांची गैरसोय खपवून घेणार नाहीउपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे
सिंदखेड राजा( अनिल दराडे )राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२८ वा जन्मोत्सव सोहळा १२ जानेवारी रोजी सिंधखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर लाखो जिजाऊ भक्त शहरात दाखल होणार आहेत. ‘या सोहळ्यासाठी येणाऱ्या कोणत्याही जिजाऊ भक्ताला त्रास होणार नाही किंवा त्यांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक विभागाने घ्यावी,’ अशी सक्त सूचना उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिल्या.
जिजाऊ जन्मोत्सवाच्या नियोजनासाठी ९ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सर्व प्रशासकीय विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रा. खडसे यांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, मुख्याधिकारी आशिष बोबडे, जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, ठाणेदार आशिष डांगळे, नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी सतीश वाकडे, आरोग्य निरीक्षक कैलास संगत, पुरातत्व विभागाचे हंडे, पोलीस विभागाचे गोपनीय अधिकारी क्षावण डोंगरे यांच्यासह महावितरण, आरोग्य विभाग आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिजाऊ सृष्टी नजीक पार्किंगची सुविधा – एसडीपीओ मनीषा कदम वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी दिली. त्यांनी म्हटले, ‘जिजाऊ भक्तांना वाहतुकीचा त्रास होऊ नये म्हणून जिजाऊ सृष्टी नजीक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जालन्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी जालना रोडवर जिजाऊ सृष्टी जवळ, तर मेहकर महालक्ष्मी रेसिडेन्सी परिसरात आणि समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या भक्तांसाठी जिजाऊ सृष्टीच्या बाजूला पार्किंगची सोय असेल.’
बस स्थानक ते जिजाऊ सृष्टी ‘मोफत बससेवा’ यंदा जिजाऊ भक्तांच्या सोयीसाठी जिजाऊ सृष्टीच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे म्हणाले की, “भक्तांची पायपीट थांबवण्यासाठी सिंधखेड राजा बस स्थानक ते जिजाऊ सृष्टी अशी ‘मोफत बस सेवा’ सुरू करण्यात आली आहे. जिजाऊ सृष्टीच्या बाजूला तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले असून, नागरिकांनी आणि भक्तांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
