ग्रामविकासात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा कर्तृत्व सन्मान

Screenshot_2026-01-11-09-09-12-43_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा (अनिल दराडे) पंचायत समिती सिंदखेड राजा कडून जिजाऊ–सावित्री कर्मयोगिनी पुरस्कार जाहीर
गटविकास अधिकारी अजित बांगर यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
सिंदखेड राजा | दि. १० जानेवारी २०२६
जिल्हा परिषद बुलढाणा व पंचायत समिती सिंदखेड राजा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव तसेच सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने पंचायत समिती स्तरावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विचारमंथन, वृक्षलागवड आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांना यावर्षी आणखी एक महत्त्वाची भर देण्यात आली असून गट विकास अधिकारी श्री. अजित बांगर यांच्या संकल्पनेतून “जिजाऊ–सावित्री कर्मयोगिनी पुरस्कार” या नाविन्यपूर्ण पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागात विविध विभागांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक विभागातून एक अशा एकूण सहा महिला कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागात शिक्षण, ग्रामविकास, आरोग्य, महिला व बालविकास, अंगणवाडी, आशा स्वयंसेविका, ग्रामसखी व स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या माध्यमातून अनेक महिला कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत कार्य करत असून ग्रामीण विकासात त्यांची मोलाची भूमिका आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होऊन इतरांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
पंचायत समिती सिंदखेड राजा अंतर्गत सर्व विभागांकडून प्राप्त झालेल्या नामनिर्देशनांमधून गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन २०२६ चे जिजाऊ–सावित्री कर्मयोगिनी पुरस्कार खालील महिला कर्मचाऱ्यांना जाहीर केले आहेत —
श्रीमती विद्या लक्ष्मण राखोंडे – सहाय्यक अध्यापिका
श्रीमती जिजा नारायण शेरकर – ग्रामपंचायत अधिकारी
कु. पूजा मधुकर शिंदे – कनिष्ठ सहाय्यक
सौ. ललिता सुनील साळवे – आशा स्वयंसेविका
श्रीमती मालिनी तेजराव जैवळ – अंगणवाडी सेविका
श्रीमती रेवती सुंदरराव आढाव – ग्रामसखी
या पुरस्कारांचे वितरण दि. १२ जानेवारी २०२६ रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मा. मनोज कार्यदे (आमदार, सिंदखेड राजा विधानसभा) व मा. श्री. गुलाब खरात (प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मभूमीत विकासासाठी योगदान देणाऱ्या जिजाऊ–सावित्रीच्या लेकींचा गौरव व्हावा व त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे गट विकास अधिकारी श्री. अजित बांगर यांनी सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!