श्री व्यंकटेश महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न
सिंदखेडराजा (अनिल दराडे)राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांनी आपल्यासमोर असे आदर्श निर्माण करून ठेवले आहेत की, आपल्या अनेक पिढ्या त्या आदर्शाचे पालन करीत घडत आल्या आहेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध युवा शिवव्याख्यात्या जयाताई मांजरे यांनी केले. स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’च्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अतिथी व्याख्यान प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे हे उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जया मांजरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण जिजाऊंचा आदर्श घ्यावा व त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून मार्गक्रमण करावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी लोकशाहीची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने झाली असे मत व्यक्त केले. आपण जिजाऊंच्या जन्माने आणि वास्तव्याने पूनित झालेल्या भूमीत राहतो हे आपले भाग्यच असा आनंदही प्राचार्य डॉ. गोरे यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देखील तुषार रहिसा हंसदास यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले यांनी केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार प्रा. सोपान चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
