मॉ जिजाऊंना राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांकडून मानाचे पूजन व महाआरती करून अभिवादन
सिंदखेड राजा (अनिल दराडे ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व स्वराज्य स्थापनेमागील प्रेरणा राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांनी अभिवादन केले. राजे लखुजीराव जाधव यांचे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा शाखेचे वंशज, देऊळगाव राजा येथील श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, युवराज्ञी मृणाल यांच्या हस्ते व इतर वंशजांच्या उपस्थितीत सकाळी ५:४५ मिनिटांनी राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळावरील मूर्तीस पुष्पहार अर्पण करून तसेच आरती ओवाळून सहपरिवार पूजा करण्यात आली.
या मानाच्या पूजेसाठी जवळखेड, उमरद, मेहुणाराजा, आडगावराजा, किनगावराजा येथील सर्व वंशजांची उपस्थिती होती. त्यांनीही माॅ जिजाऊंचे विधीवत पूजन करून अभिवादन केले.राजेजाधव परिवाराच्या वतीने राजवाड्यामध्ये राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिकात्मक पाळणा ठेवण्यात आला व त्या ठिकाणी उपस्थित वंशजांनी अंगाई गीते गाऊन मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा केला. राजे लखुजीराव जाधव यांच्या राजदरबारामधील प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जिजाऊ भक्तांनी तसेच शिवप्रेमींनी ठिकठिकाणी तोरण, पताके लावून जन्मोत्सवाची अभूतपूर्व तयारी केली होती. राजे लखुजीराव जाधवराव, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रितरित्या रेखाटण्यात आलेली भव्य रांगोळी लक्षवेधक होती.
दरवर्षीप्रमाणे मराठा सेवा संघातर्फे आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यामध्ये शिवधर्म पीठावरील मुख्य कार्यक्रमात राजे लखुजीराव जाधवराव यांचे वंशज राजे विजयसिंह जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
सिंदखेड राजा येथे जिजाऊ माॅ साहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र तसेच देशभरातील इतर भागातून जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
