पिंपळगाव राजा येथे सर्वधर्मीय संमेलन — समाज जोडण्याचे कार्य सर्वात मोठे: डॉ. सय्यद रफीक पारनेरकर
पिंपळगाव राजा( एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी )भारत लॉन येथे आयोजित सर्वधर्मीय संमेलनात अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सय्यद रफीक पारनेरकर यांनी समाजात ऐक्य, बंधुभाव आणि शांतता जपण्याचे आवाहन केले. समाज तोडणाऱ्या आणि समाज जोडणाऱ्या प्रवृत्तींचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की काही व्यक्ती समाजात मतभेद व संघर्ष निर्माण करून “आग लावण्याचे” कार्य करतात, कदाचित हे ते पैशासाठी करत असतील; परंतु या देशात लाखो सामान्य नागरिक असे आहेत जे प्रामाणिकपणे समाज जोडण्याचे कार्य करत आहेत आणि हाच देशाचा खरा बळ आहे.
आपल्या भाषणात त्यांनी संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नामदेव, पैगंबर हजरत मुहम्मद तसेच विविध सुफी संत यांच्या कार्य व त्यागाचा उल्लेख केला. या महापुरुषांनी दिलेला आदर्श आणि केलेले बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नशिबावर अवलंबून न राहता कर्तव्यनिष्ठ राहून समाज आणि राष्ट्रासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करून डॉ. पारनेरकर म्हणाले की जिजाऊंनी शिवरायांवर जसे संस्कार केले तसेच उत्तम संस्कार आजच्या पिढीवर करण्याची गरज आहे. शिवरायांच्या स्वराज्यात हिंदू–मुस्लिम समाज आनंदाने, ऐक्याने नांदत होता, हीच त्यांची खरी ओळख आणि वारसा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास सर्व धर्मांचे मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनातून सर्वधर्मीय ऐक्य, बंधुता आणि शांततेचा संदेश देत समाज जोडण्याच्या कार्याला अधिक बळ देण्याचे आवाहन करण्यात आले.
या संमेलनात सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज शिरसोलीकर, श्री हरीभाऊ वेरूळकर गुरुजी (श्री गुरूदेव सेवाश्रम, नांदुरा; संचालक – गुरूदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती, गुरुकुंज, मोहारी, जि. अमरावती), ह.भ.प. धर्मकीती महाराज सावंत (परभणी), डॉ. आर.जी. सैयद पारनेरकर, ज्ञानी गोवर्धन सिंह (जळगाव खां), भागवत मुळीक साहेब (ठाणेदार, पिंपळगाव राजा), डॉ. कवीश्वर (खामगाव), सोहेल फुरकान (JIH अध्यक्ष बुलढाणा), प्रशांत मार्तडराव देशमुख (सद्भावना मंच अध्यक्ष पिंपळगाव राजा व प्रेस क्लब खामगाव अध्यक्ष) आणि मोहम्मद जिया उल्ला (जमाअत-ए-इस्लामी हिंद अध्यक्ष, पिंपळगाव राजा) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सोहेल फुरकान यांनी केले. संमेलनानंतर उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
