मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे समुद्रमंथनाची प्राचीन मूर्ती दर्शनासाठी खुली
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात सापडलेली समुद्रमंथनाची प्राचीन मूर्ती १२ जानेवारी २०२६ पासून सर्वसामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले असून, पुढेही मूर्ती दर्शनासाठी उपलब्ध राहणार असल्याचे संबंधित विभागाने सांगितले.
या ऐतिहासिक ठेव्याच्या जतनासाठी उभारण्यात आलेल्या मूर्ती संग्रहालयाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. सिंदखेडराजा हे समृद्ध इतिहासाचे केंद्र असून, ही मूर्ती परिसराच्या सांस्कृतिक व पुरातत्त्वीय वारशात मोलाची भर घालणारी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे आणि छावा संघटनेचे अशोक राजे जाधव यांनी ९ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत मूर्ती दर्शनासाठी खुली करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने निर्णय घेतल्याने त्याचे स्वागत करण्यात आले.
आज दर्शनावेळी अशोक राजे जाधव, दीपक किंगरे, बाळासाहेब शेळके, गुलाबराव राठोड, अतिश राजे जाधव, योगेश इंगळे, शंकर शिंदे, विठ्ठल भालेराव यांच्यासह जिजाऊ भक्त, इतिहासप्रेमी व नागरिक उपस्थित होते.
