सिकलसेल मुक्त महाराष्ट्रासाठी ‘अरुणोदय’ सिकलसेल विशेष मोहीम 21 जिल्ह्यांतील सर्व नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी….
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ) राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल विशेष मोहीम येत्या दि. 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहणार नाही असे नियोजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात मोहिमेची पूर्वतयारी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन केले आहे. सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भसेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यात मुख्यतः आदिवासी भागात सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये, अशा सूचना आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या आहेत.
राज्यात 1 कोटी 5 लाखांहून अधिक तपासण्या; 12,420 रुग्ण, 1,24,275 वाहक
सन 2019 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यात एकूण । कोटी 05 लाख 86 हजार 733 सोल्युबिलिटी चाचण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये 12,420 सिकलसेल रुग्ण आणि 1,24,275 सिकलसेल वाहक आढळून आले आहेत.
राज्यात सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन 2008 पासून आदिवासी व दुर्गम भागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, रायगड व हिंगोली या 21 जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत तपसणी, निदान व उपचार आणि नागरिकांमध्ये जनजागृती, मोफत सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस व एच.पी.एल.सी. तपासणी, रुग्णांना मोफत औषधे, समुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण, टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत.
सिकलसेल आजार म्हणजे काय ?
सिकलसेल आजार हा अनुवंशिक असून आई-वडिलांपासून अपत्यांना होतो. सिकलसेल रक्त पेशीशी संबंधित आजार आहे. सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात; तर सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. सशक्त लाल रक्त पेशी रक्त वाहिन्यांतून सरळ निघून जातात. परंतु, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. त्याला ‘सिकलसेल क्रायसिस’ म्हणतात. यामुळे असह्य वेदना होतात. अशी इजा वारंवार झाल्यामुळे अवयवाला जबरदस्त इजा होऊन तो अवयव निकामी होती
प्लीहा मध्ये नष्ट झालेल्या रक्तपेशी जमा होतात, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी अडकल्यामुळे प्लीहेवर जबरदस्त सूज येते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. यामुळे आजारा विरुद्धची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे आजाराचे प्रमाण अधिक वाढते.
ज्या-ज्या भागात रक्त पुरवठा खंडित होतो, त्या-त्या भागातील अवयवांना इजा होत असते. त्यामुळे सिकलसेल रुग्णांची हाडे, फुफ्फुस, यकृत, प्लीहा, मेंदू प्रामुख्याने बळी पडून आजारांची गंभीरता वाढल्याने त्याच्या मृत्यू होऊ शकतो. हे सर्व नकळत होऊन उपचाराला सुद्धा वेळ मिळत नाही. याशिवाय, डोळे, स्वादुपिंड, त्वचा, पित्ताशय सुद्धा प्रभावित होऊ शकतात.
प्रतिबंधासाठी काय करावे?
सिकलसेल हा आजार अनुवांशिक असल्यामुळे माता-पित्याकडून अपत्यांना हा आजार होतो
विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करूनच विवाह करावा
लाल (SS) आणि पिवळे (AS) कार्ड असलेल्यांनी आपआपसात विवाह टाळावा
सिकलसेलग्रस्त किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा
सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्याच्या आत गर्भजल तपासणी करून घ्यावी
सिकलसेलची लक्षणे
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे
हाता-पायावर सूज येणे, भूक मंदावणे
सांधे दुखणे, असह्य वेदना होणे
लवकर थकवा येणे
चेहरा निस्तेज दिसणे
सिकलसेल आजारावर उपचार काय ?
सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे. या आजाराचा संपूर्ण उपचार नाही, पण नियंत्रण करणे शक्य आहे. सिकलसेल रुग्णांना नियमित आणि समतोल आहार आवश्यक आहे. सिकलसेल रुग्णाचे योग्य औषधोपचाराने आयुष्य वाढते.
सिकलसेलग्रस्त रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी व रक्त चाचणीची आवश्यकता असते.
फॉलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घेणे.
गोळ्यांचे सेवन महत्वाचे असते.
भरपूर पाणी पिणे (दररोज 8 ते 10 ग्लास)
वेदनाशामक गोळ्या, नियमित तपासणी व सल्ला घेणे.
गरज भासल्यास रक्त संक्रमण करणे.
समतोल आहार : सिकलसेल रुग्णांनी आहारात विविधता ठेवावी. दिवसातून तीन वेळा आहार घ्यावा. मासे, अंडी, संत्री, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, शेंगा, झिंक असलेले पदार्थ खावेत. बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशन करून हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो.
सिकलसेलग्रस्त रुग्णांना अर्थसहाय्य व इतर लाभ
सिकलसेलग्रस्त रुग्णांना (एसएस पॅटर्न) संजय गांधी निराधार योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळते. 10 वी व 12 वी मध्ये शिकणाऱ्या सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्येक तासाला 20 मिनिटे अधिक अवधी दिला जातो. सिकलसेल रुग्णांना उपचाराकरिता बस प्रवासात सवलत दिली जाते. सिकलसेल आजारावर पूर्ण उपचार नसला तरी योग्य औषधोपचार, नियमित तपासणी, समतोल आहार व काळजी घेतल्यास आजार नियंत्रणात ठेवता येतो.
शासनामार्फत मोफत तपासणी, निदान व उपचार सेवा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात सिकलसेल तपासणी करून घ्यावी व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधावा, तसेच आरोग्य सल्ल्यासाठी 104 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
