कमळजा माता मंदिर बुडत असताना अधिकारी गप्प – भाविक संतप्त26 जानेवारी अंतिम मुदत; अन्यथा जलसमाधी, गाव बंद व तीव्र जनआंदोलन….

IMG-20260120-WA0025

लोणार ( रघुनाथ आघाव ) जगप्रसिद्ध लोणार सरोवरात सध्या निसर्ग नव्हे, तर प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे श्रद्धेचा, इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा घात सुरू आहे. सरोवरातील पाण्याची पातळी अनियंत्रितपणे वाढत असताना कमळजा माता मंदिरासह अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली जात आहेत. मात्र हे सर्व डोळ्यांसमोर घडत असतानाही महसूल, पुरातत्व व जिल्हा प्रशासन अक्षरशः मूकदर्शकाची भूमिका बजावत असल्याचा संतापजनक आरोप कमळजा माता सेवा संघ व हजारो भाविकांनी केला आहे.
कमळजा माता मंदिराचा गाभारा, पायऱ्या आणि सभोवतालचा परिसर पाण्यात गडप होत असताना “ही केवळ इमारत नाही, ही कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे,” अशी भावना व्यक्त होत आहे. महिन्यांपासून पाणीपातळी वाढत असल्याचे स्पष्ट दिसत असताना एकही ठोस उपाय न राबवता प्रशासनाने वेळकाढूपणा केल्यामुळे आज मंदिर नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
सरोवरात येणाऱ्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांमुळे पाणी वाढत असल्याचे तज्ञ वारंवार सांगत असताना त्यांचे डायव्हर्जन करण्यासाठी साधी हालचालही करण्यात आलेली नाही. पाणीपातळी नियंत्रणासाठी तज्ञ समिती नेमणे, वैज्ञानिक उपाययोजना राबवणे आणि धार्मिक व ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी लेखी निर्णय देणे, या प्राथमिक जबाबदाऱ्यांपासून प्रशासन जाणीवपूर्वक पळ काढत असल्याचा आरोप सेवा संघाने केला आहे.
कमळजा माता सेवा संघाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “मंदिराबाबत कोणताही निर्णय घेताना स्थानिक सेवा संघाला डावलले जाणार असेल, तर तो निर्णय आम्हाला मान्य नाही.” कमळजा माता मंदिराची एक अधिकृत चाबी तात्काळ सेवा संघाकडे सुपूर्द करून दैनंदिन पूजा, आरती, धार्मिक विधी तसेच आपत्कालीन परिस्थितीत थेट प्रवेशाचा अधिकार देण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
भाविकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून, “देवालये पाण्याखाली जात असताना शांत बसणे म्हणजे श्रद्धेचा अपमान आहे. प्रशासन आमची परीक्षा पाहत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सेवा संघाने प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले आहे की, 26 जानेवारी 2026 पर्यंत ठोस, लेखी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य निर्णय जाहीर न झाल्यास जलसमाधी आंदोलन, संपूर्ण लोणार गाव बंद आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
या आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, जनतेच्या रोषाचा उद्रेक झाल्यास किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
“ही केवळ मागणी नाही, हा अंतिम इशारा आहे. कमळजा माता मंदिर वाचले नाही, तर लोणार पेटल्याशिवाय राहणार नाही,” असा संतप्त आवाज आता सर्वत्र घुमू लागला आहे

You may have missed

error: Content is protected !!