अनेक वर्षांपासून प्रलंबित वझर–आघाव–सावरगाव तेली पाणंद रस्त्याला अखेर मंजुरीमाजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश….
लोणार (रघुनाथ आघाव )तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वझर–आघाव–सावरगाव तेली पाणंद रस्ता अखेर मंजूर झाल्याने संपूर्ण परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे. या रस्त्यासाठी शिवसेना लोणार तालुका संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर तसेच डॉ. संजय रायमुलकर यांनी वेळोवेळी भक्कम पाठबळ दिले.
या रस्त्याबाबत ग्रामस्थ व शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी करीत होते. मात्र प्रशासकीय प्रक्रियेत होणारा विलंब व निधीअभावी हे काम रखडले होते. पावसाळ्यात या मार्गावर प्रचंड चिखल व पाणी साचत असल्याने शेतीमालाची वाहतूक करणे अत्यंत कठीण होत होते. त्यामुळे वाहनांचे नुकसान, अपघात तसेच दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सदर रस्ता मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मार्फत मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात एक किलोमीटर रस्त्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार असून उर्वरित टप्प्यालाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या रस्त्याच्या कामामुळे वझर, आघाव व सावरगाव तेली परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतीमाल बाजारपेठेत नेणे सुलभ होणार असून दळणवळणाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याचा थेट लाभ शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे, लोणार तालुका शिवसेना संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव व सरपंच संतोष साळवे यांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सविस्तर माहिती देत तातडीने मंजुरी देण्याची ठाम मागणी करण्यात आली होती. या भेटींचा सकारात्मक परिणाम होऊन शासन स्तरावर हालचालींना वेग आला आणि अखेर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली.
या ऐतिहासिक मंजुरीबद्दल परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी ग्रामस्थांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, डॉ. संजय रायमुलकर तसेच सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
तसेच या विषयाला सातत्याने प्रसिद्धी देऊन शासनाचे लक्ष वेधणाऱ्या विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि माध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या सकारात्मक बातम्यांबद्दलही ग्रामस्थांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत. माध्यमांच्या पाठबळामुळेच या प्रश्नाला गती मिळाल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
उर्वरित टप्प्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण रस्ता वाहतुकीस खुला करण्यात यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून या रस्त्यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
