इयत्ता चौथी शिकलेली, पण शंभर वर्षांची स्वाभिमानी सही; वाघजाईतील भिकाबाई सानप माऊलीचा शतकपूर्तीचा प्रेरणादायी सोहळा!कष्ट, संस्कार आणि आत्मसन्मानाची शंभर वर्षे; तीन पिढ्यांसाठी माऊली ठरली प्रेरणा!

IMG-20260131-WA0018

सिंदखेडराजा (अनिल दराडे)तालुक्यातील वाघजाई गावासाठी हा केवळ वाढदिवस नव्हता, तर जिद्द, स्वाभिमान आणि संस्कारांची जिवंत साक्ष होता. वाघजाई येथील भिकाबाई पाटीलबा सानप या माऊलीचा शंभरावा वाढदिवस कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भावनिक वातावरणात साजरा झाला. शतकपूर्ती करणाऱ्या या माऊलीच्या चरणी नतमस्तक होत संपूर्ण गावाने कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.
विशेष बाब म्हणजे भिकाबाई सानप या इयत्ता चौथीपर्यंत शिक्षित असूनही त्यांनी आयुष्यभर स्वावलंबन आणि आत्मसन्मान जपला. आज शंभराव्या वर्षातही त्या स्वतःची स्वाक्षरी करतात. “स्वतःची सही म्हणजे स्वतःचे अस्तित्व,” हा मौन संदेश त्या पिढ्यान्‌पिढ्या देत आहेत, असे भावनिक शब्द उपस्थितांनी व्यक्त केले.
कष्ट, संयम आणि मायेच्या बळावर कुटुंब घडवणाऱ्या या माऊलीला दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे. थोरले चिरंजीव प्रल्हाद पाटीलबा सानप हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले असून त्यांनी देशसेवेची परंपरा पुढे नेली. धाकटे चिरंजीव रामभाऊ पाटीलबा सानप हे सामाजिक जीवनात सक्रिय आहेत.
या माऊलीच्या तिन्ही मुलींची मुले आज विविध सेवाक्षेत्रांत कार्यरत असून, “माऊलीचे संस्कार म्हणजेच आमची खरी शिदोरी” अशी भावना व्यक्त झाली. शिक्षणाची मर्यादा कधीच आड येऊ दिली नाही; उलट कष्ट, प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मानाची शिकवण देत त्यांनी तीन पिढ्या घडवल्या.
भिकाबाई सानप यांचे माहेर जळगाव, ता. सिंदखेड राजा असून आयुष्यभर त्यांनी साधी, कष्टाळू आणि श्रद्धेने भरलेली जीवनशैली स्वीकारली. शांत स्वभाव, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वाभिमानाची जपणूक हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
शंभराव्या वर्षातही माऊलीचे तेज, स्मरणशक्ती आणि स्वतःची स्वाक्षरी पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. हा सोहळा केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर स्वाभिमान जपणाऱ्या मातृत्वाचा उत्सव होता. वाघजाई गावासाठी हा क्षण प्रेरणादायी, अभिमानाचा आणि इतिहासात नोंद घेण्यासारखा ठरला.

You may have missed

error: Content is protected !!