शेतात घुसून महिलेला मारहाण करणाऱ्या चौघांना ६ महिने कोठडी,अतिक्रमण आणि हिंसेप्रकरणी बुलढाणा न्यायालयाचा मोठा निकाल; २ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

Buldhana-1

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) शेतात बेकायदेशीर प्रवेश करून जबरदस्तीने नांगरणी करणाऱ्या आणि त्याला विरोध करणाऱ्या शेतकरी महिलेला विळ्याने मारहाण करणाऱ्या चार आरोपींना बुलढाणा न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी अमित खंडाळे यांनी या चारही आरोपींना सहा महिने साधा कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नेमकी घटना काय?

ही घटना २४ एप्रिल २०२४ रोजी येळगाव धरणालगत घडली होती. पीडित महिलेच्या मालकीच्या शेतात मच्छिंद्र पवार व त्याचे इतर तीन साथीदार ट्रॅक्टर घेऊन बेकायदेशीरपणे घुसले. त्यांनी शेत बळकावण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने नांगरणी सुरू केली. जेव्हा या धाडसी महिलेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी माणुसकी सोडून तिला लाथाबुक्क्यांनी आणि विळ्यासारख्या धारदार शस्त्राने मारहाण केली.
ज्यावेळी ही मारहाण सुरू होती, त्याच वेळी योगायोगाने कोथिंबीर खरेदी करण्यासाठी एक भाजीपाला व्यापारी तिथे आला होता. त्याने मध्यस्थी करत आरोपींना रोखले आणि भांडण थांबवले, ज्यामुळे महिलेचा जीव वाचला. या घटनेनंतर जखमी महिलेने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

न्यायालयाने काय म्हटले ?

सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे अॅड. हितेश रहाटे यांनी प्रभावी बाजू मांडली. सादर केलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.
यामध्ये ६ महिने साधा कारावास.दंड: प्रत्येकी २,००० रुपये (दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा).
शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या आणि महिलांवर हात उचलणाऱ्या प्रवृत्तींना या निकालामुळे कडक संदेश मिळाला आहे. कायदेशीर मार्गाने लढा दिल्यास न्याय मिळतोच, हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!