छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवासाठी २ फेब्रुवारीला नियोजन बैठक शिवजयंती उत्सव समितीचे आयोजक अशोक राजे जाधव यांचे आवाहन

IMG-20260201-WA0026

सिंदखेड राजा (अनिल दराडे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन भव्य, शिस्तबद्ध व लोकसहभागातून व्हावे, या उद्देशाने सार्वजनिक उत्सव समिती, मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुका यांच्या वतीने एक महत्त्वाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता सिंदखेड राजा येथील रेस्ट हाऊस येथे होणार आहे.या बैठकीत शिवजयंती उत्सवाचे स्वरूप, मिरवणूक मार्ग, विविध कार्यक्रमांची आखणी, सजावट, शिस्त, सुरक्षा व्यवस्था तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सव हा केवळ उत्सव नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे जतन व प्रसार करण्याचे माध्यम असल्याने तो सर्व समाजघटकांच्या सहभागातून साजरा व्हावा, असा आयोजकांचा मानस आहे.या पार्श्वभूमीवर परिसरातील व शहरातील सर्व जिजाऊभक्त, शिवभक्त, युवक मंडळे, सामाजिक संस्था तसेच सर्व पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या नियोजन बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे आयोजक अशोक राजे जाधव यांनी केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे शिवजयंती उत्सवाचे विशेष ऐतिहासिक व भावनिक महत्त्व असून, हा उत्सव आदर्श, शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरावा यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!