१०२ रुग्णवाहिका चालकांना २१ महिन्यांपासून वेतन नाही कुटुंबांवर आली उपासमारीची वेळ मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
लोणार (यासीन शेख) मागील २१ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिकांच्या कंत्राटी चालकांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, या मागणीसाठी चालकांनी मुख्यमंत्री सचिवालय व राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून ६ फेब्रुवारी निवेदन सादर केले आहे.
मागील २१ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णवाहिका कंत्राटी चालकांनी तीव्र संताप व्यक्त करत आत्मदहनाचा इशारा दिला.
मुलांचे शिक्षण, घरखर्च व औषधोपचार करणे कठीण झाल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
यापूर्वी ११ जुलै २०२५ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा आणि उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला मंडळाकडे कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती.
न्याय न मिळाल्याने चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसावे लागले होते. त्यावेळी १५ दिवसांत १८ महिन्यांचे वेतन देण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले मात्र सात महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही वेतन मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय वेतन न देता अनेक कंत्राटी चालकांना कामावरून कमी केल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोणार येथील ग्रामीण रुग्णालयातील चालक गजानन दत्तराव देशमुख यांनी सर्व चालकांच्या वतीने मंत्रालयात आत्मदहनाबाबतचे निवेदन दिले होते. मात्र, ते मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कंत्राटी चालकांनी थकीत वेतन तातडीने देण्यात यावे कामावरून कमी केलेल्या सर्व चालकांना पुन्हा नियुक्ती द्यावी दर महिन्याचे वेतन पाच तारखेपूर्वी देण्याची व्यवस्था करावी बंद केलेल्या रुग्णवाहिका सुरू कराव्यात आदी मागण्या केल्या आहेत.१० फेब्रुवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा चालकांनी या निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर सैय्यद वहीद सै. हमीद, संतोष काकड, सुरेंद्र चव्हाण, प्रवीण उमाळे, रमेश मुंडे, ऋषिकेश नागरे, जितेश जवंजाळ आदींच्या सह्या आहेत.
