हिवाळी अधिवेशनातील पाठपुराव्याला यश : केंद्रीय व राज्यस्तरीय नेतृत्वाच्या पाठबळामुळे जालना–वझर आघाव मार्गे लोणार ‘लालपरी’ अखेर धावली

Screenshot_2026-02-09-18-46-26-45_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

लोणार( रघुनाथ आघाव) ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध प्रवाशांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश आले असून जालना ते लोणार ही एस. टी. बस सेवा वझर आघाव मार्गे सुरू करण्यात आली आहे. दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ही बहुप्रतिक्षित लालपरी रस्त्यावर धावल्याने लोणार तालुक्यातील विविध गावांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू, भुमराळा, वझर आघाव, येवती, चिंचोली, सांगळे, देऊळगाव कुंडपाळ आदी गावांतील नागरिकांना उपचारासाठी, शासकीय कामांसाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी जालना व छत्रपती संभाजी नगर येथे जावे लागते. तसेच या परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी जालना व छत्रपती संभाजी नगर येथे शालेय, महाविद्यालयीन व व्यावसायिक शिक्षण घेत आहेत. मात्र यापूर्वी या सर्वांना लोणार–सुलतानपूर मार्गे जालना असा लांबचा, खर्चिक व वेळखाऊ प्रवास करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.ही गंभीर समस्या लक्षात घेऊन लोणार तालुका शिवसेना संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव व वझर आघावचे सरपंच संतोष साळवे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. या मागणीला अधिक बळ देण्यासाठी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हिवाळी अधिवेशनाच्या काळात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जालना–लोणार बस सेवा वझर आघाव मार्गे सुरू करण्याची सविस्तर मागणी मांडण्यात आली.या मागणीला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी विशेष पाठबळ दिले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांना केल्याचे सांगण्यात आले. तसेच मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनीही या मागणीस ठाम पाठिंबा देत प्रशासनाकडे सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला.केंद्रीय व राज्यस्तरीय लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळे तसेच स्थानिक पातळीवरील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे एस. टी. महामंडळाने या मागणीची दखल घेत जालना–लोणार बस फेरी दुसरबीडमार्गे जवळका, किनगाव जट्टू, भुमराळा, वझर आघाव मार्गे सुरू करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिली बस फेरी सुरू करण्यात आली.बस सुरू होताच मार्गावरील प्रत्येक गावात नागरिकांनी फुलांची उधळण, जल्लोष व आनंदोत्सव साजरा करत लालपरीचे स्वागत केले. चालक व वाहक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी एस. टी. महामंडळाचे अधिकारी, आगार प्रमुख तसेच सर्व संबंधितांचे आभार मानण्यात आले.या बस फेरीमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना थेट, सुरक्षित व वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली असून आर्थिक बचतही होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यात या मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!