डोंगर शेवली येथे वाजला ‘अभ्यासाचा भोंगा’; शिक्षणासाठी अख्खं गाव सरसावलं !टीव्ही, मोबाईल बंद करून पालकही झाले सक्रिय; जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम

IMG-20260211-WA0006

डोंगर शेवली ( गजानन दसरकर ):बदलत्या काळात मोबाईल आणि टीव्हीच्या विळख्यात अडकलेल्या विद्यार्थी पिढीला पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळवण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, डोंगर शेवली येथे ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्रभाऊ सावळे व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.गावातील मुलांच्या अभ्यासात सातत्य राहावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंद यांनी पालकांशी चर्चा करून ही संकल्पना मांडली. याला गावाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एका दानशूर माजी विद्यार्थ्याने या भोंग्यासाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. आता दररोज संध्याकाळी ७ वाजता गावात अभ्यासाचा भोंगा वाजतो आणि सर्व विद्यार्थी एकाच वेळी अभ्यासाला बसतात.या उपक्रमाचे सर्वात मोठे यश म्हणजे ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत गावातील पालक स्वतःचे मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवतात. यामुळे घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. केवळ भोंगा वाजवून न थांबता, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल लोखंडे, श्री. वाघमारे सर, श्री. सतीश दांदडे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मुले अभ्यास करत आहेत की नाही, याची खात्री करतात.उद्घाटन प्रसंगी बबनराव पाटील सावळे, छगनराव पाटील सावळे (सोमनाथ संस्थान अध्यक्ष), अमोल पाटील सावळे, शरद वानखेडे, छगनभाऊ दांदडे, रविभाऊ जवंजाळ, मोहन सावळे, भगवान सावकार यांसह अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते. शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांनीही या गृहभेटींमध्ये सहभाग नोंदवला.प्रतिक्रियाः”ग्रामीण भागातील मुलांच्या प्रगतीसाठी पालकांनी दाखवलेली ही जागरूकता कौतुकास्पद आहे. भोंगा वाजताच संपूर्ण गावात अभ्यासाची शांतता पसरते, हे चित्र सुखावह आहे.”- श्री. अनिल लोखंडे (मुख्याध्यापक)

You may have missed

error: Content is protected !!