डोंगरशेवली येथे सर्वधर्मीय उपस्थितीत शिवजयंती संपन्न; ६ वर्षीय चिमुकलीची शिवगर्जना ठरली आकर्षण

चिखली (प्रतिनिधी – गजानन दसरकर):चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षी येथे शिवजयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असतो, मात्र गावावर ओढवलेल्या एका दुःखद प्रसंगामुळे ग्रामस्थांनी उत्सवाचा डामडौल टाळण्याचा निर्णय घेतला.सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य चौकात शिवरायांचा अष्टधातूचा पुतळा उभारून पूजन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष तथा भाजप नेते भगवानराव पाटील, माजी सरपंच सरदार भाई, माजी उपसरपंच शेख फहीम भाई यांच्यासह सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम रद्द करण्याचे कारणडोंगरशेवली येथील उपसरपंच मीरा गायकवाड यांचे पती सुनील गायकवाड यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गायकवाड कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत, ‘शिवजयंती उत्सव मंडळ’ व ‘शिवगर्जना मंडळ’ यांनी यावर्षीचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि केवळ वंदना करून जयंती साजरी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार गजानन दसरकर यांनी केले, तर माजी सरपंच बबनराव बापू साबळे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी अवघ्या सहा वर्षांच्या कुमारी अवनी सुनील साबळे हिने अत्यंत मधुर आणि दमदार आवाजात ‘शिवगर्जना’ सादर केली. तिच्या या कौशल्याचे सर्व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
