तांदुळवाडी येथे अंगणवाडी केंद्राच्या वतीने शिवगर्जनेतून मानवंदना.

सिदखेडराजा( रवी ढवळे)तांदुळवाडी गावातील अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात प्रतिक काळे व पंकज काळे या दोन लहान मावळ्यांनी शिवगर्जना करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.पारंपरिक मावळा पोशाखात साकारलेल्या प्रतीक काळे आणि पंकज काळे यांच्या दमदार घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला. त्यांच्या शिवगर्जनेने उपस्थित ग्रामस्थ, महिला व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. लहान वयातच शिवचरित्राची ओळख करून देत देशभक्तीची भावना रुजविण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे तांदुळवाडी गावात शिवजयंती उत्साहात साजरी झाली असून, ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
