बुलढाण्याच्या सागर बोर्डेची आंतरराष्ट्रीय भरारी; एशियन लॅक्रोस स्पर्धेत भारताला सुवर्णपदक!सौदी अरेबियात पार पडलेल्या स्पर्धेत भारतीय संघाचे निर्भेळ यश; पाकिस्तान, इराकचा पराभव…..
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता प्राप्त असलेल्या आणि २०२८ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समाविष्ट झालेल्या ‘लॅक्रोस’ खेळात भारताने आशियाई स्तरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सौदी अरेबिया येथे २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या ‘एशियन आंतरराष्ट्रीय लॅक्रोस अजिंक्यपद’ स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या सुवर्णमयी कामगिरीत बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र सागर नंदकिशोर बोर्डे याने आपल्या अष्टपैलू खेळाने मोलाचे योगदान दिले आहे.या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय लॅक्रोस संघाने अत्यंत आक्रमक आणि कौशल्याधारित खेळाचे प्रदर्शन केले. साखळी आणि बाद फेरीत भारतीय संघाने यजमान सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि इराक यांसारख्या बलाढ्य संघांचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. या ऐतिहासिक विजयात सागर बोर्डे याने मैदानावर केलेली कामगिरी निर्णायक ठरली.सागर बोर्डे याने यापूर्वी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाची चमक दाखवली होती. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्याच मोठ्या संधीचे त्याने सोने केले असून, त्याने जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मोठी भर घातली आहे.सागरला बुलढाणा जिल्हा लॅक्रोस खेळाचे मार्गदर्शक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीराम निळे यांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र लॅक्रोस असोसिएशनचे सचिव मोहिद बाबर यांनीही खेळाडूंच्या या यशाचे कौतुक केले असून, आगामी ऑलिम्पिकच्या दृष्टीने हे यश अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा फडकवणाऱ्या सागर बोर्डेवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून, सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
