रासेयोमुळे तरुणाईत सेवा आणि नेतृत्वाची जाणीव- प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि सेवा भाव विकसित होतो. युवकांनी समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास ग्रामविकासाला नवी दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील विद्यार्थी कल्याण अधिकारी व विद्यापीठ समन्वयक डॉ. संदीप हाडोळे यांनी केले. समर्थ कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कार्याचे निरीक्षण करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित व श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचालित समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) अंतर्गत सात दिवसीय निवासी विशेष शिबिर तालुक्यातील सावखेड भोई येथे उत्साहात पार पडले. शाश्वत विकास युवा, पाणलोट व्यवस्थापन, पडीत जमीन विकास, पर्यावरण संवर्धन, कृषी-पशु समृद्धी व आरोग्य शिबिर या विषयावर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांच्या हस्ते झाले. सामुदायिक सेवेद्वारे देशसेवा करण्याची संधी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना मिळते. स्वयंसेवकांनी नेतृत्वगुण विकसित करून सामाजिक जबाबदारीची जाणीव जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी प्रास्ताविकातून शिबिरातील उपक्रमांचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमास शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, जि.प. मराठी प्राथमिक शाळा सावखेड भोईचे मुख्याध्यापक संजय मुंदानकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष टेकाळे यांच्यासह ग्रामस्थ, कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.बौद्धिक सत्रांमधून मार्गदर्शनशिबिरातील बौद्धिक सत्रांमध्ये प्रा. मधुकर जाधव यांनी विद्यार्थी जीवनातील संस्कारांचे महत्त्व, सुरज गुप्ता यांनी समाज परिवर्तनामध्ये युवकांचे योगदान या विषयांवर मार्गदर्शन केले. शिवव्याख्याते अनंत देशमुख यांचे प्रेरणादायी शिवव्याख्यानही आयोजित करण्यात आले.रा.से.यो. सहअधिकारी प्रा. अश्विनी जाधव यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रेरित ठेवण्याचे कार्य केले. तसेच शेतकरी हितगुज उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन मिरची, कांदा, कारले, टरबूज, खरबूज सीड प्लॉट तसेच द्राक्ष व लिंबू बागांची पाहणी केली आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.समारोप सोहळा उत्साहातशिबिराचा समारोप संस्थेच्या अध्यक्षा नंदा कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शेतकऱ्यांचे अनुभव, आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवावेत, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.यावेळी असिस्टंट कमिशनर ॲनिमल हसबंडरी डॉ. भरत सांगळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पवार तसेच करोके ग्रूप यांच्या उपस्थितीत विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले.शिबिराच्या यशस्वितेसाठी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. योगेश चगदळे यांनी नियोजन केले तर सहकार्यक्रम अधिकारी प्रा. विकास म्हस्के यांनी शिस्तबद्ध आयोजन केले. तसेच प्रा. वैभव देशमुख, प्रा. अर्चना सानप, प्रा. सचिन सोळंकी, प्रा. अरुण शेळके, डॉ. उषा जायभाये, प्रा. किशोर कव्हर, प्रा. गणेश घुगे तसेच सय्यद असीम, संजय लाड, गबाजी लाड, परमेश्वर मुख्यदल यांचे सहकार्य लाभले.या सात दिवसीय विशेष शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि कृषीविषयक व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.*आरोग्य व रक्तदान शिबिरे*आरोग्य जनजागृती अंतर्गत बाल आरोग्य व दंत तपासणीसाठी डॉ. आशुतोष सोळंकी, नेत्र तपासणीसाठी डॉ. कार्तिक कोल्हे, तसेच समर्थ स्कूल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य योगेश ताठे यांचे सहकार्य लाभले. जनावरांचे आरोग्य तपासणी व लसीकरणाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिरासाठी प्रकाश भांगे श्री स्वामी समर्थ ब्लड बँक, जालना यांचे सहकार्य मिळाले.*श्रमदान, जनजागृती व पर्यावरण उपक्रम*दैनंदिन कार्यक्रमात योगासने, प्रार्थना, प्रभात फेरी व श्रमदानाचा समावेश होता. शिबिरादरम्यान शोषखड्डे निर्मिती, वृक्षलागवड, मोक्षधाम स्वच्छता, “पाणी अडवा-पाणी जिरवा” अंतर्गत नदीवर बंधारा बांधणे, महिला सक्षमीकरण, मतदान जनजागृती, कृषी ज्ञानप्रसार रॅली व पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
