चिखलीत गौसंरक्षण आंदोलनाला यश; प्रशासनाचे कठोर कारवाईचे लेखी आश्वासन​आमरण उपोषण मागे; युवाचार्य विवेक दास शास्त्री महाराजांच्या मध्यस्थीनंतर तोडगा​

Screenshot_2026-03-06-19-28-47-69_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

चिखली ( निलेश कोल्हे ):चिखली शहरात अवैध गौकत्तलखाने बंद करावेत आणि गौमांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शुक्रवारी यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले. आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य संत श्री विवेक दास जी शास्त्री महाराज (काशी-वाराणसी) यांच्या मध्यस्थीमुळे या आंदोलनाला यश मिळाले आहे.​गेल्या काही दिवसांपासून शहरात अवैधपणे सुरू असलेल्या गौकत्तल आणि गौमांस विक्रीच्या विरोधात श्री ओम राजे गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या आंदोलनाची दखल घेत युवाचार्य विवेक दास शास्त्री महाराज यांनी थेट उपोषणस्थळी उपस्थिती दर्शवली. त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून आंदोलकांच्या मागण्यांचे गांभीर्य पटवून दिले.

प्रशासनाकडून ठोस कारवाईची हमी

महाराजांच्या मध्यस्थीनंतर स्थानिक प्रशासनाने आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, लेखी आदेशात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे:

१. पुढील २४ तासांत शहरातील विनापरवाना मांस विक्री करणारी दुकाने तपासली जातील आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

२. शहरात अवैध गौकत्तल रोखण्यासाठी विशेष पथकाद्वारे मोहीम राबवण्यात येईल.

३. गौमांस विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून ते प्रकार बंद करण्यात येतील.​

महाराजांचे आवाहन

यावेळी मार्गदर्शन करताना युवाचार्य विवेक दास शास्त्री महाराज म्हणाले की, “गौसंरक्षण हे केवळ धार्मिकाचे काम नसून ते सामाजिक उत्तरदायित्व आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करून कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे.” प्रशासनाच्या आश्वासनानंतर महाराजांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण सोडले.​

आंदोलनात यांचा सहभाग

यावेळी शैलेश गोंधणे, राकेश चोपडा, श्रीराम शर्मा, गजानन महाराज सपकाळ, प्रशांत जैवाळ, भरत जोगदंडे यांच्यासह साखळी उपोषणात सहभागी असलेले श्रावण गवारे, निखिल गोरे, गौरव गुजर, शुभम शेळके, सोहम वैजानकर, पवन जाधव, सौरभ जाधव, जीवन जाधव, सोनू रोकडे, आदित्य शिंदे आदींसह मोठ्या संख्येने गौसेवक आणि नागरिक उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!