खळबळजनक : शिक्षिकेचा ‘अपघात’ नव्हे, पतीनेच रचलेला खुनाचा कट!१ लाखाची सुपारी देऊन काढला पत्नीचा काटा; जळगाव जामोद पोलिसांकडून पतीसह वाहन चालकाला बेड्या.
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) जिल्ह्यातील पातुर्डा येथील एका जिल्हा परिषद शिक्षिकेचा रस्ते अपघातात झालेला मृत्यू हा अपघाती नसून, तो तिच्या पतीनेच थंड डोक्याने रचलेला खुनाचा थरार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक वादातून पतीने १ लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्याच पत्नीचा अपघाताचा बनाव रचून खून केला. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी मुख्य सूत्रधार पतीसह वाहन चालकाला अटक केली असून, संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
पातुर्डा येथील रहिवासी असलेल्या वृषाली प्रकाश गावंडे (३७) या पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. २ मार्च रोजी त्या आपल्या स्कूटरने (क्र. MH 28 AL 58 15) जात असताना, कवठळ नजीक ‘टाटा छोटा हत्ती’ (क्र. MH 28 BB 57 53) या मालवाहू वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात असल्याचा कयास लावला जात होता.भावाच्या संशयाने फुटले भांडेमृतक वृषाली यांचे बंधू सुमित डोसे यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला होता. हा अपघात नसून घातपात असावा, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली. या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या हालचालींवरून पोलिसांची सुई पती प्रकाश अनंत गावंडे याच्याकडे वळली.असा रचला खुनाचा कटपोलीस तपासात समोर आलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. आरोपी पती प्रकाश गावंडे आणि वृषाली यांच्यात घरगुती कारणावरून सतत खटके उडत असत. या वादातून सुटका करून घेण्यासाठी प्रकाशने पत्नीला कायमचे संपवण्याचे ठरवले. यासाठी त्याने आपला मित्र मंगेश चौहूलकर (रा. पातुर्डा) याच्या मदतीने मनीष नारायणसिंग सूर्यवंशी या वाहन चालकाला १ लाख रुपयांची सुपारी दिली. घटनेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे मनीषने वृषाली यांच्या स्कूटरचा पाठलाग केला आणि निर्जन स्थळी मुद्दाम धडक देऊन त्यांची हत्या केली.आरोपींना पोलीस कोठडीपोलिसांनी याप्रकरणी पती प्रकाश गावंडे आणि वाहन चालक मनीष सूर्यवंशी या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मध्यस्थी करणारा मंगेश चौहूलकर हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे आणि त्यांच्या पथकाने या ‘ब्लाईंड केस’चा अत्यंत चातुर्याने छडा लावला. एका ‘परफेक्ट क्राईम’चा बनाव रचणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद केल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
