खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा रेल्वे लोकआंदोलन समितीने व्यक्त केली आ. श्वेताताई महाले यांच्याकडे मागणी
निलेश कोल्हे
चिखली : बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरण्याची क्षमता असलेल्या खामगाव – जालना रेल्वेमार्गाचा विषय आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत पोहोचला असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी तीन महिन्यापूर्वी झालेल्या भेटीमुळे या विषयाला अधिक गती मिळाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र मागील महिन्यात केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सदर रेल्वे मार्गाबाबत कोणतेही घोषणा न झाल्याने पुन्हा एकदा खामगाव – जालना रेल्वेमार्गाबाबत निराशा हाती आली. या पार्श्वभूमीवर रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सदस्यांनी जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री मा. प्रतापराव जाधव यांना त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या मार्फत वारंवार विचारणा केली, परंतु अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य डॉ. किशोर वळसे व रेणुकादास मुळे यांनी ८ मार्च रोजी मा. आ. श्वेताताई महाले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान समितीच्या वतीने आ. महाले यांना एक निवेदन सादर करण्यात आले असून त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न व पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा जिल्ह्याचे मागासपण दूर करण्याच्या उद्देशाने खामगाव – जालना रेल्वेमार्गाची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन सदर रेल्वेमार्गाकरता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी व्यक्त करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी रेल्वेलोक आंदोलन समिती च्या ४२ दिवसांच्या आंदोलन नंतर मा. आ. श्वेताताई यांच्या पाठपुराव्याने राज्य सरकारने या रेल्वेमार्गाला ५० टक्के निधी मंजूर करत असल्याचे पत्र केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सुपूर्द केले होते. याबाबतचा ठराव देखील राज्य मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला होता. परंतु, तरीदेखील केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला अद्याप अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने ही प्रक्रिया नेमकी कोठे थांबली आहे ?कोणत्या बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे ? याचा मागोवा घेतल्यास आवश्यक त्या गोष्टींची उपायोजना करून लवकरात लवकर मंजुरी मिळू शकेल असा विश्वास समितीच्या सदस्यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना किंवा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून खामगाव – जालना रेल्वेमार्गाच्या विषयात सद्यस्थिती काय आहे याबाबतची अधिकृत माहिती देखील आ. श्वेताताई महाले यांना मिळवता येईल. तसे झाल्यास याबाबत पुढील कार्यवाहीची दिशा देखील स्पष्ट होईल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरील सर्व विषयासंदर्भात एकदा प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारकडे अधिक जोरकसपणे पाठपुरावा करण्याची विनंती करणे आवश्यक आहे, त्यासाठी आ. श्वेताताई महाले यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा रेल्वे लोकआंदोलन समितीने व्यक्त केली. आ. महाले यांनी देखील या संपूर्ण विषयाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे ग्वाही श्वेताताई महाले यांनी भेटीदरम्यान रेल्वे लोकांदोलन समितीच्या सदस्यांना दिली आहे.
