बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; शस्त्र आणि जुगारासह १.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त​

IMG-20260310-WA0011

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ): जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत एका कारसह तलवार आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.​पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यात अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी विविध पथके तयार करून ही कारवाई केली.

पहिली कारवाई: देऊळगाव राजा येथे कारसह तलवार जप्त​९ मार्च रोजी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत

‘जनता जिनिंग’ समोर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी एम.एच. १२ जी.एफ. ८०६७ क्रमांकाच्या कारची झडती घेतली असता, राहुल भास्कर झोरे (वय ३३, रा. माळीपुरा, साखरखेर्डा) याच्याकडे एक गुप्त तलवार आढळून आली. पोलिसांनी १ हजार रुपयांची तलवार आणि १ लाख रुपये किमतीची कार असा एकूण १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध आर्म ॲक्ट आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसरी कारवाई: जुगार अड्ड्यांवर छापे​दुसऱ्या कारवाईत एलसीबीच्या पथकाने तामगाव आणि लोणार पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन ठिकाणी छापेमारी केली:​तामगाव हद्दीत: पातूर्डा येथील माच्छी मार्केट आणि आठवडी बाजार परिसरात जुगार खेळणाऱ्या भीमराव श्रावण खंडारे (वय ५५) आणि बाळकृष्ण सोनाजी भानगे (वय ५०) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले.​लोणार हद्दीत: लोणार बस स्टँडजवळ वरली मटका जुगार खेळणाऱ्या अलियार खान बशारत खान (वय ४२) याला पकडून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.​या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी १ तलवार, १ चारचाकी वाहन आणि ३,८६० रुपयांची रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण १,०४,८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.​सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक (बुलढाणा) अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनील अंबुलकर, सपोनि पंकज सपकाळे, प्रताप बांजड व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशन करत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!