तहानलेली गावे… धरणात पाणी, पण शेतात दुष्काळ; खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आमदार मनोज भाऊ कायंदे यांना साकडे

IMG-20260315-WA0039

रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी

लोणार :- खडकपूर्णा धरणात पाणीसाठा उपलब्ध असताना दुसरीकडे वझर आघाव परिसरातील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणीसाठा पूर्णतः आटण्याच्या स्थितीत आल्याने शेतकरी व ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. “धरणात पाणी असताना आमच्या शेतात दुष्काळ का?” असा सवाल उपस्थित करत वझर आघाव येथील शेतकऱ्यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मनोज भाऊ कायंदे यांच्याकडे खडकपूर्णा प्रकल्पातून तातडीने पाणी सोडण्याचे साकडे घातले आहे.वझर आघाव व वझर सरकटे गावांच्या मधोमध खडकपूर्णा नदीवर उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर परिसरातील अनेक गावे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. मात्र सध्या बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून तो जवळपास संपल्याने वझर आघाव, वझर सरकटे, भुमराळा, सावरगाव तेली, चांगेफळ, खापरखेड यासह परिसरातील सुमारे दहा ते पंधरा गावांवर तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.पाण्याअभावी शेतातील पिके करपण्याची भीती निर्माण झाली असून जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचीही टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर या भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर वझर आघावचे सरपंच संतोष साळवे, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती डॉ. केशवराव आघाव व पत्रकार रघुनाथ आघाव यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह आमदार मनोज भाऊ कायंदे यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. खडकपूर्णा प्रकल्पातून तातडीने पाणी सोडल्यास कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणीसाठा वाढून परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.शेतकऱ्यांची व्यथा ऐकून आमदार मनोज भाऊ कायंदे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. आपल्या स्तरावरून संबंधित विभागाशी पाठपुरावा करून खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील व पाणी लवकरात लवकर या परिसरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

You may have missed

error: Content is protected !!