आमदार धीरजभाऊ लिंगाडे यांच्या पुढाकारातून शेलोडी जि.प. शाळेला ‘डिजिटल बोर्ड’ची भेट१.८० लाखांच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण होणार ‘स्मार्ट
शेलोडी ( बुलढाणा माझा वृत्तसेवा ):ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच आधुनिक व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अमरावती विभागाचे पदवीधर आमदार श्री. धीरजभाऊ रामभाऊ लिंगाडे यांच्या विशेष पुढाकारातून शेलोडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीचा अत्याधुनिक डिजिटल बोर्ड भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठी भर पडणार असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.आजच्या वेगवान डिजिटल युगात शिक्षण अधिक प्रभावी आणि रंजक बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाला आहे. हीच गरज ओळखून आमदार धीरजभाऊ लिंगाडे यांनी शेलोडी शाळेला हा डिजिटल बोर्ड उपलब्ध करून दिला. या साधनामुळे शिक्षकांना अध्यापन करताना विविध चित्रे, व्हिडिओ, अॅनिमेशन आणि सादरीकरणाचा (PPT) प्रभावी वापर करता येणार आहे. यामुळे कठीण विषय सोप्या पद्धतीने समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार असून, त्यांच्यातील शिकण्याची आवड अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक दालनआमदार लिंगाडे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील नामांकित शाळांप्रमाणेच आता शेलोडी येथील जिल्हा परिषद शाळेतही ‘स्मार्ट क्लासरूम’चे स्वप्न साकार झाले आहे. या योगदानामुळे शाळेतील अध्यापन पद्धतीत सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा शिक्षकवृंदांनी व्यक्त केली.ग्रामस्थांकडून आभार प्रदर्शनया उल्लेखनीय योगदानाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि शेलोडी ग्रामस्थांनी आमदार धीरजभाऊ लिंगाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
