वादळ, अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा; लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान — लोणार तालुका शिवसेना संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव यांची नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी

Screenshot_2026-03-20-07-37-39-01_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

रघुनाथ आघाव, लोणार तालुका प्रतिनिधी

लोणार :- तालुक्यात गुरुवारी (दि. १९ मार्च) सायंकाळी अचानक हवामान बदलल्यामुळे वादळी वारे, जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीटीने अनेक गावांना अक्षरशः तडाखा दिला. सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आणि काही मिनिटांतच शेतकऱ्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील वझर, आघाव, भुमराळा, सावरगाव तेली, कासारी, येवती, चिंचोली, सांगळे, पार्डा, दराडे, देऊळगाव, कुंडपाळ, धायफळ, बिबखेड, आजिसपुर, खुरमपुर, शिवणी जाट यांसह संपूर्ण लोणार तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.या अवकाळी पावसामुळे विशेषतः गहू, कांदा, मका आणि हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार असलेली गव्हाची पिके आडवी पडली असून, गारपीटीमुळे कांदा आणि मक्याचेही मोठे नुकसान झाले आहे. मक्याची कणसे तुटून पडली असून, गारांच्या माऱ्यामुळे पिकांची पाने फाटली आहेत. काही ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.स्थानिक शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली की, काही मिनिटांतच डोळ्यासमोर उभे केलेले पीक उद्ध्वस्त झाले. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.दरम्यान, शेतकऱ्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कृषी विभाग, महसूल प्रशासन आणि पिक विमा कंपन्या घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे नेमके कधी करणार, असा सवाल आहे. तसेच शासनाकडून तातडीने मदत जाहीर होणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पिक विम्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे सध्याच्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. “जुना विमा मिळाला नाही, तर नव्या नुकसानीचे काय?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.महसूल व कृषी विभागाकडून लवकरच पंचनामे सुरू होईल, अशी माहिती मिळत असली तरी प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, तसेच पिक विमा कंपन्यांनी त्वरीत मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.या पार्श्वभूमीवर, लोणार तालुका शिवसेना संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव यांनी भ्रमणध्वनीद्वारे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर तसेच लोणार तहसीलदार भुषण पाटील यांना नुकसानीची माहिती दिली. तसेच, या नुकसानीची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे.या अवकाळी संकटामुळे लोणार तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने त्वरित हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!