एकलारा येथे ‘इफ्तार पार्टी’तून जोपासला सामाजिक सलोखामाजी सरपंच गजानन अंभारे यांचा पुढाकार; हिंदू-मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती
चिखली (अजहर शेख):तालुक्यातील एकलारा येथे सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत, माजी सरपंच गजानन अंभारे यांच्या वतीने गुरुवारी शानदार ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वधर्मीय बांधव एकाच पंक्तीत बसल्याने गावात बंधुभावाचे दर्शन घडले.रमजान महिन्याचे पवित्र पर्व सुरू असताना, गावातील सामाजिक वीण अधिक घट्ट व्हावी या उद्देशाने गजानन अंभारे यांनी या इफ्तारचे आयोजन केले होते. सायंकाळी रोजा इफ्तारच्या वेळी गावातील विविध स्तरांतील नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी गजानन अंभारे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून रमजानच्या शुभेच्छा दिल्या. “राजकारण आणि समाजकारणापलीकडे जाऊन आपल्या गावातील प्रेम आणि आपुलकी कायम राहावी, हाच या आयोजनामागचा मुख्य हेतू आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.या इफ्तार पार्टीमध्ये खजूर, फळे आणि विविध स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल होती. उपस्थितांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्याने वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता.मान्यवरांची उपस्थिती:या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती लक्ष्मण अंभोरे, पत्रकार अजहर शेख, विजू लंके, बंडू अंभोरे, संदिप झगरे, अमोल अंभारे, गणी शेख, बबलू सर, प्रकाश अंभोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि गावातील हिंदू-मुस्लिम प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी आणि स्तुत्य आयोजनाबद्दल गजानन अंभारे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
