श्रीक्षेत्र केशवशिवणी येथे अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन २५ मार्चपासून रामनवमी महोत्सवाला प्रारंभ

सिंदखेडराजा( अनिल दराडे )सिंदखेड राजा तालुक्यातील श्रीक्षेत्र केशवशिवणी येथील केशवराज संस्थानच्या वतीने श्री रामनवमी महोत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सप्ताहाचे २४ वे वर्ष असून, वै. ह.भ.प. गुरुवर्य श्री रंगनाथ बाबा उर्फ लहरीबाबा यांच्या कृपाशीर्वादाने हा आध्यात्मिक सोहळा २५ मार्च ते २६ मार्च २०२६ दरम्यान उत्साहात पार पडणार आहे.समाजात नैतिक मूल्यांची जपणूक व्हावी, व्यसनाधीनता दूर होऊन सुसंस्कृत नागरिक घडावेत, या उद्देशाने दरवर्षी ग्रामस्थांच्या सहकार्याने या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या वाणीतून भाविकांना ज्ञानामृताचा लाभ मिळणार आहे. बुधवार, २५ मार्च रोजी रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर महाराज झगरे गुरुजी (वाकडकर) यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. गुरुवर्य श्री प्रेमानंद महाराज देशमुख (पांगरी फाटा) यांचे ‘रामजन्म’ विशेष कीर्तन होईल. त्याच दिवशी दुपारी १२.३० ते २ या वेळेत ह.भ.प. गुरुवर्य श्री रमेश महाराज जायभाये (वैष्णवगड) यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद वितरण ह.भ.प. गुरुवर्य श्री त्र्यंबकबुवा सानप गुरुजी (श्रीक्षेत्र वैष्णवगड) यांच्या शुभहस्ते होणार असून, अन्नदाता म्हणून श्री नारायणराव बंडुजी उदावंत व त्यांचे कुटुंबीय सेवा देत आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन केशवराज संस्थानचे अध्यक्ष श्री वसंतराव नारायणराव उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, केशवशिवणी येथील ग्रामस्थ व परिसरातील भजनी मंडळे सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.या मंगलमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
