धनादेश अनादर प्रकरणी बुलडाणा न्यायालयाचा कडक दणका; आरोपी शिक्षकास ३ महिने सश्रम कारावास!२ लाख ८० हजारांचा दंड; रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ महिना तुरुंगवासॲड. गुणवंत नाटेकर यांनी प्रभावीपणे मांडली फिर्यादीची बाजू…
बुलडाणा ( बुलढाणा माझा न्युज ):आर्थिक व्यवहारातील फसवणूक आणि धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणी बुलडाणा येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उसने घेतलेले पैसे परत न करता फिर्यादीची फसवणूक करणाऱ्या आरोपी नरेंद्रसिंग राजपूत याला न्यायालयाने दोषी ठरवत ३ महिने सश्रम कारावास आणि २ लाख ८० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
बुलडाणा येथील रहिवासी संदीप अच्युतराव गवई यांनी आरोपी नरेंद्रसिंग रामसिंग राजपूत (शिक्षक, महाराष्ट्र विद्यालय, जानोरी ता. शेगाव, जि. बुलडाणा) यांना १ लाख ७० हजार रुपये उसने दिले होते. ठरलेल्या मुदतीत आरोपीने ही रक्कम परत केली नाही. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर आरोपीने फिर्यादीस १.७० लाख रुपयांचा धनादेश (चेक) दिला.बँकेत धनादेश ठरला ‘बाऊन्स’फिर्यादीने संबंधित धनादेश बँकेत सादर केला असता, तो अनादरित (बाऊन्स) झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संदीप गवई यांनी ॲड. गुणवंत नाटेकर यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली. या प्रकरणी न्यायालयात प्रदीर्घ आणि सविस्तर सुनावणी पार पडली.न्यायालयाचा रोखठोक निकालसुनावणीअंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत आरोपी नरेंद्रसिंग राजपूत यास दोषी ठरवले. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम २५५ (२) तसेच परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १४३ अन्वये ही शिक्षा सुनावण्यात आली.
निकालातील मुख्य बाबी:सश्रम कारावास: आरोपीला ३ महिने कठोर कारावासाची शिक्षा.आर्थिक दंड: मूळ रकमेपेक्षा अधिक म्हणजे २ लाख ८० हजार रुपये दंड.दंड न भरल्यास शिक्षा: आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला मुख्य शिक्षेव्यतिरिक्त आणखी १ महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
