करवंड ग्रामपंचायतसमोर सुरू उपोषण मागे; पत्राद्वारे कळविला निर्णयकरवंड येथील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सुरू होते उपोषण

IMG-20260327-WA0001

चिखली (निलेश कोल्हे) चिखली तालुक्यातील करवंड गावातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येबाबत एका नागरिकाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. अर्जदार अशोक लक्ष्मण पवार यांनी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटविण्याची गरज व्यक्त केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, उपआरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बस स्थानक, मराठी पूर्व माध्यमिक शाळा, जनावरांचा कोठा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणार्‍या रस्त्यांलगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. याशिवाय महादेव मंदिर परिसरातही अतिक्रमण वाढल्याचे सांगण्यात आले आहे. अर्जदाराने प्रशासनाकडे सर्व शासकीय जागांवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी २५ मार्च पासून करवंड ग्रामपंचायतीसमोर उपोषणही सुरू केले होते. २६ मार्च रोजी सदर उपोषण अखेर मागे घेण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला पत्राद्वारे अधिकृत कळविण्यात आले. यापूर्वी दि. १६ मार्च २०२६ रोजी तसेच दि. १७ मार्च २०२६ रोजी उपोषणासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. करवंड ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण व इतर स्थानिक प्रश्नांबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अपेक्षित तोडगा न निघाल्याने ग्रामपंचायतसमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, संबंधित विषयावर चर्चा व पुढील कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतने नियमांनुसार कार्यवाही करावी, तसेच प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून पुढील कार्यवाहीबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

You may have missed

error: Content is protected !!