सुरक्षिततेचे नियम धाब्यावर! २०० लिटर डिझेल उघड्यावर साठवणे पडले महागात; पंप मालक संकटात.

1774784799875

चिखली (बुलढाणा माझा न्युज ): जागतिक युद्धाच्या अफवेने सामान्यांच्या डोक्यात कशा प्रकारे ‘वेड’ शिरू शकते, याचा थरकाप उडवणारा प्रकार चिखली शहरात समोर आला आहे. इंधन टंचाईच्या भीतीपोटी एका पठ्ठ्याने चक्क पाण्याच्या उघड्या टाकीत २०० लिटर डिझेल भरून साठवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जीवघेण्या निष्काळजीपणाची दखल घेत प्रशासनाने चिखली येथील ‘रेणुका पेट्रोलियम’ या पेट्रोल पंप मालकावर गुन्ह्याची नोंद केली आहे.

नेमकी घटना काय?​

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण होईल, अशी अफवा सध्या वाऱ्यासारखी पसरत आहे. याच अफवेला बळी पडून चिखलीतील एका व्यक्तीने भविष्यातील तजवीज म्हणून डिझेल साठवण्याचे ठरवले. मात्र, साठवणूक करण्यासाठी ड्रम किंवा सुरक्षित टँकरऐवजी चक्क ‘पाण्याच्या उघड्या टाकीचा’ वापर करण्यात आला. निवासी भागात अशा प्रकारे उघड्यावर ज्वलनशील पदार्थ ठेवणे म्हणजे संपूर्ण परिसराला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासारखे होते.​ बातमी प्रसारित होताच जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून चिखली तहसीलदारांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. तपासात ही बाब सत्य आढळल्यानंतर प्रशासनाने कडक पावले उचलली.​पेट्रोल पंप मालक पोलिसांच्या जाळ्यात​केवळ नफा कमावण्याच्या उद्देशाने किंवा नियमांकडे दुर्लक्ष करून उघड्या टाकीत इतक्या मोठ्या प्रमाणात डिझेल देणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर आता कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे.​दाखल गुन्हे: चिखली शहर पोलिसांनी तहसीलदार यांच्या तक्रारीवरून रेणुका पेट्रोलियमच्या मालकावर BNS २२३ (आदेशाची अवज्ञा) आणि BNS २८७ (ज्वलनशील पदार्थाबाबत निष्काळजीपणा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.​

प्रशासनाचा इशारा

​इंधनाची अशा प्रकारे असुरक्षित साठवणूक करणे हा केवळ कायद्याने गुन्हा नसून तो मानवी जीविताशी खेळ आहे. एक साधी ठिणगी देखील संपूर्ण परिसरात मोठा अनर्थ घडवून आणू शकली असती. नागरिकानी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारे इंधनाचा अवैध साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!