धक्कादायक: देऊळगाव राजा तालुक्यात ४४ लाखांची अफू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईअंढेरा पोलिसांच्या हद्दीत सरंबा-धोत्रा शिवारात छापा; १ क्विंटल ११ किलो अफूच्या झाडांसह शेतकरी अटकेत
बुलढाणा ( एकनाथ माळेकर ):जिल्ह्यात अमली पदार्थांच्या छुप्या शेतीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अंढेरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत देऊळगाव राजा तालुक्यातील 30 मार्च रोजी सरंबा-धोत्रा शिवारात मोठी धाड टाकली. या कारवाईत सुमारे ४४ लाख ५० हजार रुपये किमतीचा १ क्विंटल ११ किलो वजनाचा अफूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शेतकरी संजय तुकाराम चेके याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे काही दिवसांपूर्वीच अफूच्या शेतीवर मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा-धोत्रा शिवारातील गट नंबर ३३८ मध्ये अफूची बेकायदेशीर लागवड केल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबी आणि अंढेरा पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी शेतात अफूची झाडे आणि बोंडे मोठ्या प्रमाणात आढळून आली.
४४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईत १ क्विंटल ११ किलो वजनाची अफूची झाडे आणि बोंडे हस्तगत करण्यात आली. बाजारभावानुसार या मालाची किंमत ४४ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून पूर्ण करण्यात आली.सदर कारवाईत देऊळगाव राजाचे नायब तहसीलदार साहिल जाधव, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी एम. के. सोनवणे, आणि ग्राम महसूल अधिकारी सुरेश शेळके यांची उपस्थिती होती.तसेच, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे, एलसीबीचे पीएसआय प्रताप बाजड, दिगंबर कपाटे, पुरुषोत्तम आघाव, वनिता शिंगणे, मनोज खारडे, पूजा सावळे, सतीश नाटेकर, समाधान टेकाळे, दुय्यम ठाणेदार दिनेश घुगे, सिद्धार्थ सोनकांबळे, मारुती कांयदे आणि पंढरी नेमाने या पथकाने ही यशस्वी मोहीम फत्ते केली.अंढेरा पोलीस ठाणे चर्चेतदेऊळगाव राजा आणि चिखली तालुक्याच्या सीमेवरील गावांमध्ये अमली पदार्थांची शेती वाढत असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लागोपाठ होणाऱ्या या कारवायांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
