शहिदांमुळेच भारतीयांना स्वातंत्र्याचा ‘शहद’ चाखायला मिळाला – प्रा. मधुकर जाधव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात व्याख्यान संपन्न
सिंदखेडराजा (अनिल दराडे) आपल्या देशाला थोर समाज सुधारकांची आणि क्रांतीकारकांची उज्ज्वल परंपरा लाभली असून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शहिद झालेल्यांमुळे आपल्याला स्वातंत्र्याचा ‘शहद’ चाखायला मिळाला, असे प्रतिपादन देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहिदांच्या स्वप्नातील भारत या विषयावर आयोजित अतिथी व्याख्यानात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे उपस्थित होते. अधिसभा सदस्य श्री. नितीन टाले व श्री. कैलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. निलेश कडू हे देखील उपस्थित होते.स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास हा प्रत्येक भारतीयांच्या काळजावर कोरलेला आहे त्यामुळे तो कधीच पुसला जाऊ शकत नाही, असे मतही प्रा. जाधव यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नितीन टाले आणि कैलास चव्हाण यांनी देखील मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी शहिदांचे स्मरण हे फक्त एका दिवसापुरते नसावे तसेच त्यांचे विचार सातत्याने आत्मसात करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. निलेश कडू यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. भगवान किनाके यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
