तंटामुक्त गाव समित्या आता कागदोपत्रीच, जिल्हा प्रशासनाकडून होत आहे दुर्लक्ष: ग्रामीण भागात चिंतनाचा विषय….
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) गाव पातळीवर होणारे भांडण तंटे लक्षात घेता तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली होती. गावातील तंटे हे पोलिस ठाण्यांमध्ये न जाऊ देता गावपातळीवरच समोपचाराने मिटवून गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे हा मुख्य उद्देश या समितीचा होता सरकार बदलले व काळ बदलला. तंटामुक्त गाव समित्या आता फक्त कागदावरच उरल्या आहेत. त्या पूर्णपणे निष्क्रिय झाल्याची बाब दिसून येत आहे. गावात निर्माण होणारे लहान-मोठे तंटे गाव पातळीवर समोपचाराने मिटवून गावात शांतता प्रस्थापित करणे सर्व धर्मियांकडून साजरे होणारे धार्मिक सण-उत्सव एकोप्याने, आनंदाने साजरे करून गावातील अवैध धंदे बंद करण्यात येऊन गाव व्यसनमुक्तीच्या दिशेने जावे गावात, अनिष्ठ रूढी परंपरा यांना थारा असू नये. निराधार शोषित पीडित महिलांना सुरक्षिततेचे कवच मिळावे असे अनेक उद्देश घेवून तंटामुक्त गाव समिती त्या होत्या. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व उदासीनतेमुळे या समित्या आता फक्त कागदावरच उरल्या आहेत. त्यामुळे गावात तंट्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या बांधाचे प्रश्न थेट पोलिस ठाणे व कोर्टात जास्त असल्याने त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामध्ये सुरुवातीच्या काळात अनेक गावांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता. प्रत्येक गावात या समित्यांचे गठण करण्यात आले होते. त्यावेळेस मात्र तंटामुक्त गाव समीत्या सक्रिय होत्या आणि गावातील तंटे वाद हे पोलीस स्टेशन पर्यंत न जाऊ देता गावातच तंटामुक्त गाव समित्या समोपचाराने मिटवीत होत्या. आणि गावातील अवैध धंदे यांना सुद्धा काही प्रमाणात आळा बसला होता. आता मात्र गावात अवैध धंद्यांना उत आला असून गावात तंटे व वादविवादाचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तरी याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवुन तंटामुक्त गांव समित्या ह्या पूर्वीप्रमाणेच सक्रिया करण्याची खरी गरज आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील होणारे शेतकऱ्यांचे धुऱ्यावरील भांडण गावात होणारे तंटे हे गावातच मिटतील त्यामुळे या समितीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे
