लोणार येथे आज भव्य ‘योग महोत्सव’;प्रशासनाने यशस्वी आयोजनासाठी सज्ज राहावे -केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव…

0
WhatsApp Image 2026-04-06 at 6.04.32 PM

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ): जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे उद्या, ७ एप्रिल रोजी भव्य ‘योग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘काउंटडाऊन’ उपक्रमाचा भाग म्हणून साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात सर्व शासकीय यंत्रणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात लोणार येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आयुष विभागाच्या सहसचिव मोनालिसा दास, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, मुरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान चे संचालक डॉ. काशिनाथ समघंडी, कार्यक्रम अधिकारी डॉ. ईश्वर आचार्य यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे ७५ दिवस शिल्लक असताना योगाचा व्यापक प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने आयुष मंत्रालयाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ७ हजारांहून अधिक योगसाधक सहभागी होणार असल्याची माहिती देताना प्रतापराव जाधव यांनी योग ही भारतीय संस्कृतीतील प्राचीन परंपरा असून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली असल्याचे सांगितले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रण याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले. या योग महोत्सवाच्या माध्यमातून लोणार सरोवर या पर्यटन स्थळाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्यास मदत होणार असून, एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी ‘त्रिकोणासन’ करण्याचा विक्रम नोंदवत एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमात इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, योग विद्या गुरुकुल, क्रीडा भारती, पतंजली योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हिंग, महिला बचत गट तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!