“दुसरबीड पेटलं!” — उपोषण तीव्र; ‘कारवाई नाही तर गाव बंद’चा इशारा
रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी
सिंदखेड राजा:- तालुक्यातील दुसरबीड येथीलवर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या मूलभूत प्रश्नांमुळे दुसरबीड गावात संतापाचा ज्वालामुखी फुटला असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शांततेत सुरू झालेल्या या आंदोलनाने आता आक्रमक रूप धारण केले असून प्रशासनाविरोधात रोष उसळला आहे.देऊळगाव मही धरणाच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाईन अपूर्ण असल्यामुळे गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाइपलाईन टाकताना उकरलेले रस्ते अद्याप दुरुस्त न झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि रखडलेली विकासकामे यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला आहे.दरम्यान, या आंदोलनाला आता विविध स्तरातून जोरदार पाठिंबा मिळू लागला आहे. शेतकरी योद्धा कृती समितीचे बालाजी सोसे यांनी उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा देत प्रशासनावर टीका केली आहे. तसेच भाजपाचे जील्हा महामंत्री आजा.नानासाहेब तौर आणि सुरेश बुलकडे भाजपा तालुका उपाध्यक्ष, शे.जावेदभाई महामंत्री अल्पसंख्याक भाजपा.यांनीही आंदोलनस्थळी भेट देत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.“उपोषणावर तात्काळ ठोस कारवाई झाली नाही, तर दुसरबीड बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल,” असा कडक इशारा आंदोलक आणि समर्थकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उपोषणस्थळी बसलेले ग्रामस्थ ठाम असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या दबावामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा करावी आणि प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.दरम्यान, “दुसरबीड बंद”च्या इशाऱ्यामुळे गावातील वातावरण अधिकच तापले असून, हे आंदोलन आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
