चिखली तहसील कार्यालयाचा लोकसेवा हक्क दिनी गौरवविविध दाखले वेळेत वितरित करून 98.27 टक्के यश; सुट्टीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांची सेवा…
चिखली (एकनाथ माळेकर)महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 28 एप्रिल हा दिवस ‘लोकसेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने नागरिकांना विविध शासकीय सेवा विहित मुदतीत आणि मुदतीपूर्वी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.चिखली तहसील कार्यालयाने नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, शेतकरी दाखला, भूमी अभिलेखविषयक दाखले, तसेच इतर अधिसूचित सेवा वेळेत उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील नागरिकांना 98.27 टक्के सेवा वेळेत पुरविण्यात आल्या असून, हे यश प्रशासकीय कार्यक्षमतेचे आणि लोकाभिमुख दृष्टिकोनाचे द्योतक आहे.विशेष बाब म्हणजे, हे अभूतपूर्व यश मिळविण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही काम करून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ व समर्पित प्रयत्नांमुळे चिखली तहसील कार्यालयाने जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.या उत्कृष्ट कार्याची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नायब तहसीलदार श्री. हरी ज्ञानदेव वीर आणि महसूल सहाय्यक श्री. हरिदास थोलबरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख, महसूल विभागाचे सर्व उपविभागीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये तहसील कार्यालयामार्फत 65 हजारांहून अधिक दाखले वितरित करण्यात आले आहेत. आदरणीय उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , तहसीलदार विजय सवडे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे यश साध्य झाले आहे.चिखली तहसील कार्यालयाची ही कामगिरी लोकसेवा हक्क अधिनियमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाचा उत्कृष्ट आदर्श ठरली आहे.
