वढव (ता. लोणार) मध्ये मध्यरात्री भीषण आग; ६–७ शेतकऱ्यांचे संसार राख — आगीच्या तांडवाने गाव हादरले….

0
IMG-20260429-WA0039

रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी

लोणार:- तालुक्यातील वढव गावात काल मध्यरात्री उसळलेल्या भीषण आगीने अक्षरशः तांडव माजवले. काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण करत एकामागून एक घरे आपल्या कवेत घेतली आणि ६ ते ७ शेतकऱ्यांचे संसार डोळ्यादेखत जळून खाक झाले. ज्वाळांचे लोट आणि धुराचे प्रचंड ढग आकाशात उसळत असल्याने संपूर्ण गाव भीतीच्या छायेत गेले होते.मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेली ही आग एवढ्या वेगाने पसरली की, गावकऱ्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. घरात झोपलेल्या कुटुंबांनी जीव वाचवण्यासाठी अक्षरशः धावाधाव करत बाहेर पळ काढला. महिलांचा आक्रोश, लहान मुलांचे रडणे आणि जळणाऱ्या घरांचा कडकडाट यामुळे परिसरात हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते.गावातील बहुतांश घरे जवळजवळ असल्याने आगीने झपाट्याने फैलाव घेतला. काही घरांतील धान्याचे पोते, शेतीसाठीची साधने, घरगुती साहित्य, कागदपत्रे आणि जनावरे बांधण्याची जागा देखील आगीत होरपळून गेली. अनेक कुटुंबांचे वर्षानुवर्षे साठवलेले धान्य आणि संसाराची उभारणी काही क्षणांत राखेत परिवर्तित झाली.घटनेची माहिती मिळताच मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनीही रात्री दीड वाजताच उपस्थित राहत मदतकार्याची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे लोणार व मेहकर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. आगीचे रौद्ररूप पाहता रिसोड येथूनही अतिरिक्त अग्निशमन गाडी पाचारण करण्यात आली.रात्रीच्या अंधारात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून दाभा येथील कृषी फिडरचा वीजपुरवठा सुरू करून पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली. तसेच टँकरद्वारे पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही जीवाची पर्वा न करता अग्निशमन दलाला मदत केली. तब्बल चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. अंगावरचे कपडे सोडले तर सर्व काही जळून गेल्याने पीडित कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. गावात सर्वत्र राखेचे ढिग, जळालेली भिंती आणि उद्ध्वस्त झालेले संसार पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.या वेळी तहसीलदार भूषण पाटील, अ‍ॅड. आकाश घोडे तसेच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, बाधित कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत व पुनर्वसनासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सध्या महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू असून, नेमके किती घरांचे आणि किती रुपयांचे नुकसान झाले याचा अधिकृत आकडा लवकरच समोर येणार आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन वाठोरे यांनी तातडीने मदत देण्याची मागणी केली असून, शासनाने या कुटुंबांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.या भीषण घटनेमुळे वढव गावासह संपूर्ण लोणार तालुक्यात शोककळा पसरली असून, शासनाच्या मदतीची सर्वांना आतुरतेने प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!