मंगरूळमध्ये पाण्यासाठी वणवण; ६७ लाखांची पाणी योजना कागदावरच!​सरपंच पतीकडून अधिकाऱ्यांसमोरच अश्लील शिवीगाळ; चिखली पंचायत समितीसमोर ५ मे पासून उपोषणाचा इशारा….

0
Screenshot_2026-04-29-16-41-31-84_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

​चिखली (एकनाथ माळेकर):चिखली तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे गेल्या दोन वर्षांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामपंचायतीच्या अजब कारभारामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. शासनाने मंजूर केलेल्या ६७ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला असून, याप्रश्नी जाब विचारणाऱ्यांना आता सत्ताधाऱ्यांच्या अरेरावीचा सामना करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मंगरूळ गावासाठी २०२१ मध्ये ६७ लाख रुपये खर्चाची पाईपलाईन, विहीर आणि वीज कनेक्शनची योजना मंजूर झाली होती. या योजनेचे काम पूर्ण झाल्याचे भासविले जात असले तरी, नियोजनाच्या अभावामुळे ग्रामस्थांना थेंबभर पाणीही मिळालेले नाही. पाईपलाईन बुडीत क्षेत्रातून टाकल्यामुळे ती वारंवार लीक होते, परिणामी लाखो रुपये खर्चूनही ही योजना निरुपयोगी ठरली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही स्थिती ओढवल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.​या पाणीटंचाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ३० एप्रिल रोजी मोर्चा काढण्याचे निवेदन दिले होते. यावर तोडगा काढण्यासाठी २८ एप्रिल २०२६ रोजी अंढेरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रुपेश शक्करगे यांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ग्राम सहाय्यक अधिकारी शिंदे मॅडम, पोलीस पाटील गवते मॅडम आणि तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते.​चर्चा सुरू असतानाच, संतापजनक बाब म्हणजे सरपंच पती यांनी सर्व अधिकाऱ्यांसमोर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले असून, “कोणीही प्रशासनाला प्रश्न विचारू नये” अशा आविर्भावात ही अरेरावी करण्यात आली. महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतीचा हा भ्रष्टाचार आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास, तक्रारकर्ते आणि त्रस्त ग्रामस्थ ५ मे २०२६ पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत.​”शासनाचा पैसा पाण्यात गेला असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि मंगरूळवासीयांची तहान भागवावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही,” असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!