कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे ‘शेतकरी-शास्त्रज्ञ मंच’ सभा संपन्न; खरीप हंगामाचे नियोजन व नवीन अध्यक्ष निवड….
बुलढाणा (एकनाथ माळेकर):कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची ३९ वी सभा २९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी खरीप हंगामाचे योग्य नियोजन, हवामान बदल आणि नैसर्गिक शेती यावर या सभेत सविस्तर मंथन करण्यात आले. याच सभेत मंचाच्या आगामी काळासाठी श्री. मोहन जगताप आणि श्री. प्रकाश सपकाळ यांची नवीन अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. आशितोष लाटकर यांनी आगामी खरीप हंगामातील आव्हाने आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन पिकांचे नियोजन कसे करावे, यावर शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना आणि शेतीतील नवीन व्यावसायिक संधींची माहिती देऊन शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरण्याचे आवाहन केले.पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अमितकुमार दुबे यांनी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचे सादरीकरण केले. यावेळी मंचाच्या सदस्यांनी पशुपालनातील अडचणी आणि योजनांच्या अंमलबजावणीबाबत तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली.केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे आणि कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कानवडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रामुख्याने नैसर्गिक शेतीचे महत्त्व, हळद आणि शेवगा लागवडीचे तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी शेती पद्धतीत कोणते बदल आवश्यक आहेत, यावरही यावेळी चर्चा झाली.सभेच्या उत्तरार्धात शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये श्री. मोहन जगताप आणि श्री. प्रकाश सपकाळ यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष श्री. विजय भुतेकर आणि श्री. स्वप्निल महाजन यांनी नूतन अध्यक्षांचे स्वागत केले. सभेला डॉ. जगदीश वाडकर, डॉ. अनिल तारू, डॉ. सुकेशनी वाणे, प्रवीण देशपांडे, डॉ. गणेश काळूसे, कु. कोकिळा भोपळे, दीपक चौमवाल, कु. अनुराधा जाधव, रणजीत सदार यांसह मंचाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल तारू यांनी केले
