शेतकऱ्यांचे मोटार पंप चोरणारे ३ अट्टल चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाची धडाकेबाज कारवाई…
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )शेतकरी बांधवांच्या शेतातील विद्युत मोटार पंपांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. चिखली तालुक्यातील आंधई शिवारात झालेल्या चोरीच्या तपासात पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे दोन विद्युत पंप हस्तगत करण्यात आले आहेत.जानेवारी २०२६ मध्ये चिखली तालुक्यातील आंधई येथील शेतकरी बळीराम सखाराम बऱ्हाटे आणि प्रल्हाद मानिकराव मोरे यांच्या शेतातील धरण व विहिरीवरून ७.५ एच.पी. आणि ५ एच.पी. चे दोन मोटार पंप चोरीला गेले होते. याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (अ.क्र. ०६/२०२६) दाखल करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, आंधई येथीलच तीन युवक चोरीचे पंप विक्रीसाठी अमडापूर शहर परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमडापूर बसस्थानक परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, पोत्यामध्ये लपवलेले दोन विद्युत पंप मिळून आले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली. हे आहेत आरोपी अतुल भानदास सौभागे (वय १९ वर्षे, रा. आंधई)उमेश समाधान शेळके (वय ३२ वर्षे, रा. आंधई)आदेश सुनील चौथे (वय २४ वर्षे, रा. आंधई)पोलीस पथकाचे यशही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा (खामगाव) आणि श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर, सपोनि. अविनाश जायभाये, अंमलदार अनंता फरतळे, सुनील मिसाळ आणि गणेश वाघ यांच्या पथकाने केली. आरोपींना पुढील कारवाईसाठी अमडापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
