…तर निराधार योजनेचे अनुदान होणार बंद; ‘हयात प्रमाणपत्र’ ऑनलाईन सादर करणे बंधनकारक चिखली तहसीलदारांचे लाभार्थ्यांना आवाहन; जूनपासून नियमाची अंमलबजावणी…
चिखली (एकनाथ माळेकर)महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ७ मे २०२६ रोजी घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना आता ‘हयात प्रमाणपत्र’ (Life Certificate) ऑनलाईन सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. चिखली तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हे प्रमाणपत्र अद्यावत केलेले नाही, त्यांनी ते त्वरित करावे, अन्यथा जून महिन्यापासून त्यांचे अनुदान बंद करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार श्री. विजय सवडे यांनी दिला आहे.शासकीय योजनांचा लाभ खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी शासनाने प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी अनेकदा प्रमाणपत्र सादर करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी आता मोबाईल ॲप आणि सेवा केंद्रांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र स्वतःच्या मोबाईलवर गुगल प्लेस्टोअरवरून अधिकृत ॲप डाऊनलोड करून सादर करता येईल. यासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड वापरून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) पर्याय निवडून हयात प्रमाणपत्र अद्यावत करता येईल.ज्या लाभार्थ्यांकडे मोबाईल सुविधा उपलब्ध नाही, त्यांना खालील माध्यमांतून मदत घेता येईल: गावातील तलाठी किंवा कोतवाल. ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक. आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा नागरी सेवा केंद्र.या संदर्भात कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास लाभार्थ्यांनी चिखली तहसील कार्यालयातील ‘संगायो’ शाखेशी संपर्क साधावा. मात्र, जे लाभार्थी हे प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करणार नाहीत, त्यांचा लाभ जून महिन्यापासून शासन निर्णयानुसार थांबवला जाईल, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
