केशव शिवणीतील भगवान नगर रस्ता अद्यापही दयनीय रस्त्याच्या कामात अडथळा; सात जणांवर 353 कलमांतर्गत गुन्हा…
सिंदखेडराजा ( अनिल दराडे) भारताला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे उलटून गेली तरी केशव शिवणी (ता. सिंदखेडराजा) येथील मूलभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. गावातील केशवराज महाराज मंदिरासमोरून भगवान नगर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून, त्यामुळे गावातील शाळेतील एका वर्गखोलीवर बंद होण्याची वेळ आली आहे. याशिवाय, गावात सार्वजनिक वापरासाठी स्मशानभूमीची एकही इमारत अस्तित्वात नाही.सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ७ ऑगस्ट रोजी तहसीलदार, पोलीस यंत्रणा व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. मात्र, रस्ता अडवणाऱ्या काही व्यक्तींनी विरोध दर्शवून जेसीबीसमोर उभे राहत कामात अडथळा निर्माण केला. यामुळे नियोजित काम पूर्ण होऊ शकले नाही.या प्रकारामुळे सात जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर अडथळे दूर करून ग्रामस्थांना सुसज्ज रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

