शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ; वृक्षारोपण व विद्यार्थ्यांबरोबर खिचडीचे भोजन करुन केले स्वागत डॉ प्रविण कुमार वराडे
सिंदखेडराजा (अनिल दराडे )जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा वाघोरा येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विशेष म्हणजे मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांसोबत खिचडी भोजनाचा आस्वाद घेत संपूर्ण सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
प्रवेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक, पालक आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत बसून एकत्रितपणे खिचडी भोजनाचा आनंद घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केले होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाच्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
शाळेतील अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती आकर्षण निर्माण होते आणि शिक्षणाची गोडी वाढीस लागते, असे मत यावेळी सिंदखेडराजा चे नायब तहसीलदार डॉ प्रविण कुमार वराडे व पालकांनी व्यक्त केले.
